‘साेलापुरात आयटीपार्कसाठी उद्याेजकच जागा निवडणार’; हैदराबाद, पुण्यातील उद्योजकांचा लवकरच दौरा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। सोलापुरात आयटी पार्कसाठी जागा शोधाच्या हालचाली सुरू आहेत. सध्‍या जी जागा उपलब्ध आहे, ती जागा अंतिम करण्यासाठी लवकरच हैदराबाद व पुणे येथील नामवंत उद्योजक येणार आहेत. त्यांच्या पसंतीनंतरच आयटी पार्कसाठी जागेची अंतिम निवड केली जाणार आहे. पण, या उद्योजकांचा दौरा खूपच गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. जागा पाहणीनंतर एक बैठकही होण्याची शक्यता नाकारत येत नाही.

शासकीय जागा शोधण्याची मोहीम सुरू असताना दुसरीकडे कुंभारी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जागेचा पंचनामा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे, पण त्यापूर्वीच उद्योजकांकडून जागेची पाहणी करण्यात येणार आहे, त्यांच्या पसंतीनुसारच जागेची निवड करण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हास्तरावरील जागेची निवड व उद्योजकांची पसंती झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत अंतिम निर्णयासाठी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महसूल प्रशासन व एमआयडीसी संयुक्तरित्या जागेची शोध मोहीम सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तहसीलदारांना शहराच्या शेजारी असलेल्या शासकीय जागा शोधण्याचे आदेश दिले. उत्तर तहसीलकडून शहरातील तर दक्षिण सोलापूर तहसीलदारांकडून शहराच्या शेजारी असलेल्या जागा शोधण्याचे काम सुरू आहे. पण दोन्ही तहसीलकडून आयटी पार्कसाठी म्हणावी तशी शासकीय जागा उपलब्ध झाली नाही. पण जागा कुठे आणि किती उपलब्ध आहे, याबाबत अंतिम माहिती लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार आहे.

शासकीय नाही, खासगी जागेचा पर्याय….
मिळालेल्या माहितीनुसार आयटी पार्कसाठी आवश्यक असलेली शासकीय जमीन शहर व परिसरात उपलब्ध नाही. यामुळे शहरातील खासगी जागेचा पर्याय उपलब्ध असणार आहे, किंवा कुंभारी येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेचा पर्याय आहे. शहरात जागेचा शोध सुरू असून तहसीलदारांचा अहवाल आल्यानंतरच कोणती जागा योग्य आहे, याचा निर्णय होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *