महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने बाजारपेठांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठांच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. बोहरी आळी, रविवार पेठ, इलेक्ट्रॉनिक मार्केट या भागांत प्रामुख्याने कोंडी झाली होती. त्यामुळे दुचाकी चालविणेही अवघड झाले होते. परिणामी अनेकांनी या भागांत वाहने घेऊन जाणे टाळले.
गणपतीची मूर्ती बुक करणाऱ्यांचे प्रमाणही आज वाढले होते. गणपती आणि गौराईच्या स्वागतासाठी पूजा साहित्य आणि फुलांनी बाजारपेठ सजली होती. गणेशमूर्ती सजावटीच्या साहित्यालाही ग्राहकांची मोठी मागणी होती. त्यामुळे काही ठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांना अर्धा किलोमीटर अंतरासाठी ३० मिनिटांचा वेळ लागत होता. शिवाजी महाराज रस्त्यावर महापालिकेपासून वाहतूक संथगतीने पुढे जात होती.
अगदी स्वारगेटपर्यंत हीच परिस्थिती होती. तर बाजीराव रस्त्यावर शनिवारवाडा परिसरातही कोंडी होती. जंगली महाराज रस्त्यावर डेक्कन परिसरात सातत्याने कोंडी होत होती. नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथावर (एफसी रस्ता) टप्प्याटप्प्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. या मार्गांना जोडणारे अनेक रस्ते वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाले होते. सकाळपासूनच या भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलिस तैनात केले होते. काही ठिकाणी एका बाजूने वाहतूक सुरू करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत होते.
उपनगरेही जाम गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शेवटची सुट्टी असल्याने अनेकांनी रविवारचा मुहूर्त साधला. त्यामुळे कात्रज, बिबवेवाडी, बाणेर, पाषाण, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर या भागांतदेखील खरेदीचा उत्साह आणि कोंडी दिसून आली.