महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम११ ची मूळ कंपनी ड्रीम स्पोर्ट्स फायनान्शिअल सर्व्हिस सेक्टरमध्ये एन्ट्री करण्यासाठी एका नवीन अॅप ‘ड्रीम मनी’ची चाचणी करत आहे. हा नवीन व्यवसाय ड्रीम सूट फायनान्स ब्रँड अंतर्गत केला जाईल. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे. ड्रीम स्पोर्ट्स ही भारतात पैशावर आधारित ऑनलाइन गेम प्रदान करणारी एक आघाडीची कंपनी आहे. परंतु सरकारनं सर्व प्रकारच्या पैशावर आधारित ऑनलाइन मनी गेमवर बंदी घातल्यानंतर, ड्रीम११ ला देखील त्यांचे सर्व पैशावर आधारित गेम बंद करावे लागलेत.
या प्रकरणाशी संबंधित एका सूत्रानं सांगितलं की, “ड्रीम मनी गेल्या काही महिन्यांपासून एका पायलट प्रोजेक्ट अंतर्गत काम करत आहे.” कंपनीने अद्याप प्लॅटफॉर्म सादर केलेला नाही. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हे अॅप दररोज १० रुपयांपासून सोने खरेदी आणि १००० रुपयांपासून फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) सेवा प्रदान करेल. हे अॅप ड्रीम स्पोर्ट्सच्या युनिट ड्रीमसूटनं जारी केले आहे.
हे व्यवसाय अद्यापही सुरू
ड्रीमसूटच्या वेबसाइटनुसार, ड्रीमसूट फायनान्स लवकरच ‘सीमलेस फायनान्शियल सर्व्हिसेस’ प्रदान करण्यासाठी सुरू केलं जाईल. ड्रीम स्पोर्ट्सनं त्यांचे ऑनलाइन मनी गेम्स बंद केले आहेत, परंतु स्पोर्ट्स एक्सपिरीयन्स आणि ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म ड्रीम सेट गो, स्पोर्ट्स इव्हेंट तिकीट सेवा आणि बिझनेस प्लॅटफॉर्म फॅनकोड, स्पोर्ट्स डेव्हलपमेंट युनिट ड्रीम गेम स्टुडिओ आणि नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन चालवत आहेत.
रियल मनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी
संसदेने गेल्या आठवड्यात गुरुवारी राज्यसभेत सर्व प्रकारच्या मनी गेमिंगवर बंदी घालणारे आणि ई-स्पोर्ट्स आणि ऑनलाइन सोशल गेमिंगला प्रोत्साहन देणारं विधेयक मंजूर केलं. सरकारनं यावर भर दिला की ऑनलाइन मनी गेमिंग ही एक गंभीर सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे, ज्याचा समाजावर स्पष्ट नकारात्मक परिणाम होत आहे. त्याच वेळी, केंद्र सरकार ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंगला प्रोत्साहन देण्यावर भर देत आहे आणि भारताला क्रीडा विकासाचं जागतिक केंद्र म्हणून स्थापित करू इच्छित आहे.