महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। गणेशोत्सवाच्या आगमनापासूनच पावसानं हजेरी लावली आणि आता घरगुती गणरायांच्या विसर्जनाचा दिवस उजाडलेला असतानाही पावसानं काही माघार घेतलेली नाही. उलटपक्षी येत्या दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. त्यामुळं बाप्पाच्या निरोपासही पावसाची हजेरी असेल हेच आता स्पष्ट होत आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार विदर्भातील पूर्वेकडे असणारे जिल्हे, चंद्रपूर, गडचिरोली इथं पावसाचा जोर वाठढणार असून, या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोकणात किनारपट्टी भागांसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्येही काळ्या ढगांची दाटी वाढणार असून, या भागाला पावसाचा मारा सोसावा लागणार आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही पावसाची जोरदार हजेरी असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं या भागांमध्ये हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.
Heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa and in Ghat areas of Madhya Maharashtra. Light to moderate rain/Thunderstorm and gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 1, 2025
का वाढलं पर्जन्यमान?
हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण आणि गोव्यानजीकच्या घाट क्षेत्रात अतिमुसळधार पावसाचा अंदात असून, मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरींची शक्यता मराठवाड्यासाठी वर्तवण्यात आली आहे, जिथं वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल.
सध्याच्या घडीला म्यानमारच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या सागरी क्षेत्रामध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, तिथंच कमी दाबाच्या पट्ट्यासाठीसुद्धा पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या ढगांचीच दाटी होताना दिसत आहे. दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची रिमझिम आणि अधूनमधून येणाऱ्या जोरदार सरीची हजेरी असेल.
सप्टेंबरअंती पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात होणार असून, यादरम्यानच परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे. ज्यामुळं काही भागांमध्ये टप्प्याटप्प्यानं तापमानवाढीसही सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान जाणकारांनी वर्तवला आहे.