महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका झाली आहे. सिंहगड रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या पुण्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या पुलामुळे ३० मिनिटांचा प्रवास आता फक्त ६ मिनिटांमध्ये होणार आहे. हा उड्डाणपूल ३ टप्प्यात ११८ कोटी ३७ लाख रूपये खर्च करून तयार करण्यात आला आहे. हा पूल वाहतुकीसाठ खुला झाल्यामुळे पुणेकरांना आनंद झाला आहे.
सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल आजपासून सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले असून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरून धायरी, नऱ्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी तसेच बंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दररोज सुमारे दीड लाखांहून अधिक वाहनांची वाहतूक होते. या मार्गाच्या एका बाजूला मुठा नदी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असल्याने पर्यायी रस्ता शक्य नसल्यामुळे उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते.
पुणे महानगरपालिकेमार्फत या उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २१ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले होते. त्यानंतर हा पूल बांधण्यात आला. हा उड्डाणपूल तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सिंहगडकडून स्वारगेटकडे जाणारा ५२० मीटर लांबीचा राजाराम पूल चौकातील उड्डाणपूल तयार करण्यात आला. या पूलासाठी १५ कोटी रुपये खर्च आला. दुसऱ्या टप्प्यात विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरदरम्यानचा स्वारगेटकडून सिंहगडकडे जाणारा २.१ किमी लांबीचा उड्डाणपूल तयार करण्यात आला. या पूलासाठी ६१ कोटी रुपये खर्च आला.
तर तिसऱ्या टप्प्यात वीर शिवाजी काशीद चौक ते कै. प्रकाश विठ्ठल इनामदार चौकदरम्यानचा सिंहगडकडून स्वारगेटला जाणारा १.५ किमी लांबीचा उड्डाणपूल तयार करण्यात आला. यासाठी ४२ कोटी रुपये खर्च करण्यात आला. या तिन्ही टप्प्यांसाठी एकूण ११८.३७ कोटी रुपये खर्च आला आहे. महत्वाचे म्हणजे राजाराम पूल ते फन टाईम थिएटर या २.६ किमी अंतरावरील सहा चौक पार करण्यासाठी आधी ३० मिनिटांचा कालावधी लागत होता. पण आता नव्या उड्डाणपुलामुळे हा वेळ आता केवळ ५ ते ६ मिनिटांवर आला आहे.
Pune: पुणेकरांसाठी गुड न्यूज! अर्ध्या तासाचा प्रवास फक्त ६ मिनिटांत, पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल झाला सुरू
Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक कोंडीची कटकट संपणार, सर्वात मोठा उड्डाणपूल आज खुला होणार
दरम्यान, पुलाखालील रस्त्याचे सुयोग्य विकसन करून दोन्ही बाजूस तीन लेनची वाहतूक क्षमता, प्रशस्त पदपथ आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच दुभाजकाचे सुशोभीकरण सीएसआर अंतर्गत दोन एजन्सींमार्फत पूर्ण करण्यात आले असून, त्याची देखभाल पुढील पाच वर्षे त्यांच्याच माध्यमातून होणार आहे. या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे नागरिकांना आनंद झाला आहे.