महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। राज्यात सध्या गणेशोत्सव सुरु असून, आता एकामागोमाग सण येतील आणि सर्वांना सुट्टीची उत्सुकता असेल. गणपती गेल्यानंतर नवरात्री, त्यानंतर दसरा, दिवाळी असे सण असतील. यादरम्यान पुण्यामधील नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण पुणे जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. यानुसार पुण्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. 1 सप्टेंबर, 22 सप्टेंबर आणि 20 ऑक्टोबर असे तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आदेशात लिहिल्यानुसार, विभागीय आयुक्त पुणे विभाग डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सन 2025 या वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी खालील दिवस स्थानिक सुट्ट्या म्हणून जाहीर केल्या आहेत. अन्वये, दि. १४ मार्च १९८३ रोजी शासन, सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हा आदेश करण्यात आला आहे.
सन 2025 मधील स्थानिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे :
१) सोमवार, दि. 1 सप्टेंबर 2025 – गौरीपूजन
२) सोमवार, दि. 22 सप्टेंबर 2025 – घटस्थापना
३) सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 – नरक चतुर्दशी
विभागीय आयुक्तांच्या माहितीनुसार, 1 सप्टेंबरला गौरीपूजनाची सुट्टी आहे. यानंतर 22 सप्टेंबरला घटस्थापना होणार असून त्या दिवशी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं बंद असणार आहेत. त्यानंतर 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशीलाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच या तीन सुट्ट्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.