महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ सप्टेंबर ।। महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
📍 कोठे होणार जोरदार पाऊस?
पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार सरींची शक्यता.
मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर राहणार.
📍 मराठवाड्यात स्थिती
औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज; नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन.
📍 विदर्भात काय?
बहुतांश भागात आकाश उघडे राहण्याची शक्यता; काही ठिकाणी तुरळक सरींची नोंद होईल.
दरम्यान, गेल्या २४ तासांत डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३१.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी, तर विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस नोंदवला गेला.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, शक्यतो अनावश्यक प्रवास टाळण्याची सूचना दिली आहे.