महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०५ सप्टेंबर | गणेशोत्सव साजरा करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या कोकणवासीयांना यंदाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) ठिकठिकाणी रखडलेली कामे, रस्त्यावरील खड्डे आणि वाहतुकीचे ढिसाळ नियोजन यामुळे वाहनांच्या ताफ्याला कासवगतीने पुढे सरकावे लागले.
🚦 कोंडीची भीषण स्थिती
संगमेश्वर, इंदापूर, पेण, माणगाव आणि पळस्पे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. साधारण आठ ते दहा तासांत पूर्ण होणारा प्रवास यावेळी तब्बल १६ ते २१ तासांपर्यंत लांबला. या विलंबामुळे विशेषतः लहान मुले, महिला व वृद्ध प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
संगमेश्वर येथे अर्धवट राहिलेल्या पुलाच्या कामामुळे वाहतूक जुन्या अरुंद पुलावर वळवण्यात आली होती, त्यामुळे येथेच प्रवास अक्षरशः ठप्प झाला. तर माणगाव, इंदापूर, पोलादपूर, पळस्पे आणि पेण येथील खड्ड्यांमुळे प्रवास अधिकच किचकट झाला.
👮 व्यवस्था कोलमडली
गणेशोत्सवाच्या सुरुवातीला वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित दिसत होते. मात्र, परतीच्या प्रवासावेळी संपूर्ण व्यवस्था ढासळली. लाखो वाहनांचा ताफा आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिस व होमगार्ड हतबल झाले. अनेक ठिकाणी रुग्णवाहिकाही तासन्तास अडकून पडल्या. गर्दीचा फायदा घेत हॉटेलांनी दरवाढ केली, तर पेट्रोलपंपांवर इंधनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
🚆 रेल्वे गाड्याही उशिरा
प्रवासाचा त्रास केवळ महामार्गापुरता मर्यादित राहिला नाही. कोकण रेल्वेवरील नियमित गाड्या एक ते दोन तास उशिराने, तर गणपतीसाठी सोडलेल्या विशेष गाड्या तब्बल पाच ते सहा तास उशिराने धावल्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
👉 कोकणवासीयांचा गणेशोत्सव आनंदाने साजरा झाला असला तरी परतीच्या प्रवासात झालेली दमछाक मात्र यंदाही टळली नाही.