महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० सप्टेंबर | सोन्याच्या भावाने दिल्लीतील सराफा बाजारपेठेत मंगळवारी ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. सोन्याचा भाव तोळ्याला (प्रति १० ग्रॅम) ५ हजार ८० रुपयांची उसळी घेऊन १ लाख १२ हजार ७५० रुपयांवर पोहोचला. २०२५ सालात आतापर्यंत सोन्याच्या भावात ४३ टक्के वाढ झाली आहे.
ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सराफा बाजारपेठेत शुद्ध सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला सोमवारी १ लाख ७ हजार ६७० रुपये होता. हा भाव मंगळवारी १ लाख १२ हजार ७५० या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला. सोन्याच्या भावात चालू वर्षात ४३ टक्के म्हणजेच ३३ हजार ८०० रुपये वाढ झालेली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी प्रति १० ग्रॅमला ७८ हजार ९५० रुपयांवर सोने होते. दिल्लीतील बाजारपेठेत चांदीचा भाव किलोमागे २,८०० रुपयांनी वधारून १ लाख २८ हजार ८०० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याच्या भावाने उच्चांकी झेप घेतली असून, प्रति औंस ३ हजार ६५९ डॉलरवर तो पोहोचला आहे. मागील सत्राच्या तुलनेत भावात ०.४६ टक्का म्हणजेच १६.८१ डॉलरची वाढ झाली आहे. अमेरिकेतील कामगार क्षेत्राची कमकुवत आकडेवारी समोर आली असून, यामुळे तेथील मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हकडून पतधोरणात शिथिलता येण्याची शक्यता आहे. अर्थात व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे डॉलरच्या भावातील घसरणीचा फायदा सोन्याला होत आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्याकडे वळत आहेत.