नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ११ सप्टेंबर | काठमांडू : बेरोजगारांची वाढलेली संख्या, घरघर लागलेली अर्थव्यवस्था तसेच समाजमाध्यमांवर घातलेली बंदी अशा अनेक समस्यांमुळे असंतोषाचा स्फोट होऊन सध्या धगधगणाऱ्या नेपाळमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबविण्यासाठी लष्कराने देशभरात संचारबंदी लागू केली. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लष्कराने ही कारवाई केली. गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.

मंगळवारी रात्रीपासून लष्कराने शांतता प्रस्थापित करण्यासाठी ध्वजसंचलनही सुरू केले आहे. राजधानी काठमांडूमध्ये बुधवारी शुकशुकाट होता. रस्त्यांवर लष्करी जवान पहारा देत होते. नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले. मंगळवारी निदर्शकांनी संसद, राष्ट्रपती कार्यालय, पंतप्रधानांचे निवासस्थान, शासकीय इमारती, सर्वोच्च न्यायालय आणि वरिष्ठ नेत्यांच्या घरांना आगी लावल्या होत्या.

२७ निदर्शकांना अटक
सुरक्षा दलांनी काठमांडूच्या विविध भागांतून लूटमार, जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्या २७ लोकांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान छाबहिल, गौशाला भागातून ३.३७ लाख रुपये रोख, ३१ शस्त्रे, मॅगझिन आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी नेपाळमध्ये अडकले
काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बुधवारीदेखील बंद ठेवण्यात आला होता. मात्र, बुधवारी संध्याकाळनंतर विमानतळ पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर विमानसेवा देखील पूर्ववत सुरू करण्यात आली.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांनी मदतीसाठी जवळच्या सुरक्षा चौकीशी संपर्क साधावा, असे लष्कराने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *