भारतावर 100 टक्के टॅरिफ लावा! ट्रम्प यांचा युरोपियन संघावर दबाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ११ सप्टेंबर | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असे म्हणावे लागेल. एकीकडे ट्रम्प भारतासोबत ट्रेड डीलवर मवाळ भूमिका देत पुन्हा दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होणार असल्याचे सांगतात, तर दुसरीकडे अन्य देशांना भारता विरोधात भडकवण्याचे काम करताना दिसत आहेत. ट्रम्प यांनी युरोपियन संघाला (ईयु) भारत आणि चीनवर भारी टॅरिफ लावण्यास सांगितल्याचे समजते.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार एका अमेरिकन आणि ईयु अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. ट्रम्प यांनी ईयु अधिकाऱ्यांना चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतावरही असेच भारीभक्कम टॅरिफ लावण्यास सांगितले आहे, जेणेकरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यावर दबाव टाकला जाईल.

युरोपियन संघाच्या राजनयिकाने सांगितले की, युरोपियन संघाने त्यांच्या विनंतीला मान्यता दिली तर त्यांची रणनीती पूर्णपणे बदलून जाईल. आतापर्यंत ईयु रशियाला वेगळे करण्यासाठी निर्बंध लादत आहे, शुल्क नाही.

ट्रम्प यांनी युरोपने रशियावरील निर्भरता पूर्णपणे कमी केली नसल्याची याआधी अनेकदा तक्रार केली आहे. गेल्या वर्षी युरोपियन युनियनने रशियाकडून सुमारे 19 टक्के गॅस खरेदी केला, पण ईयुने रशियन ऊर्जेवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवण्यास वचनबद्ध असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी आधीच भारतीय आयातींवर अतिरिक्त 25 टक्क्यांसह एकूण 50 टक्के टॅरिफ लादले आहे, तर चिनी निर्यातीवर 30 टक्के कर आकारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *