“सत्ता कोरडी, पवना ओसंडली… पत्रकारांनी सांभाळली परंपरा!”

Spread the love

Loading

पवना धरण भरले… पत्रकारांनी केली “पवनामाईची आरती”!

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ सप्टेंबर | महापालिकेत सत्ताधारी नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत, पण पवना धरण मात्र वर्षभर पिंपरीकरांची तहान भागवते. आणि म्हणूनच गेली चार वर्षे “पवनामाईचे जलपूजन” ही जबाबदारी शहरातील पत्रकारांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

आजही पवना धरण १०० टक्के भरल्यावर जलपूजनाचा सोहळा पार पडला. ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते धरणाचे पूजन करण्यात आले. त्यांच्या सोबत शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते. पुष्पहार, श्रीफळ वाहून विधी झाला आणि पवनामाईला कृतज्ञतेची वंदनं करण्यात आली.

यावेळी बापूसाहेब गोरे म्हणाले –
“धरण वर्षभर तहान भागवते. महापालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत, अधिकारी कारभार पाहतात. पण परंपरा खंडित होऊ नये म्हणून पत्रकारांनी पुढाकार घेतला. हे जलपूजन म्हणजे पवनामाईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे.”

धरण गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच भरलं होतं. पण गणेशोत्सवाच्या गडबडीत “पवनामाईची आरती” उशिरा झाली. अखेर आज जलपूजन पार पडलं आणि नंतर पत्रकारांनी जलविहार करून या परंपरेला रंगत आणली.

🖋️ “पाणी पिऊन तहान भागते, पण पवनामाईशिवाय पिंपरीकरांचं आयुष्य नाही… म्हणूनच हे जलपूजन पत्रकारांच्याच हातून होणं म्हणजे ‘धन्य परंपरा!’”

कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, सुनिल उर्फ बाबू कांबळे, प्रविण शिर्के, विनय लोंढे, संटलाल यादव, सुरज साळवे, देवा भालके, जितेंद्र गवळी, दिलीप देहाडे, संतोष जराड, गणेश शिंदे आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *