महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ सप्टेंबर | दिवाळी आणि छठपूजा या सणांच्या निमित्ताने लाखो प्रवासी गावाकडे परततात. दूरवरचा प्रवास रस्ते मार्गाने करणे खूप त्रासदायक होते. तसेच विमान मार्गे ते खिशाला परवडणारे नसते. अशावेळी रेल्वेचा प्रवासखूप सोयीस्कर पडतो. दरम्यान सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवाशांना गुड न्यूज दिलीय.
सणा सुदीच्या काळात वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने एकूण १,१२६ विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यापूर्वी ९४४ गाड्या जाहीर झाल्या होत्या, आता त्यात आणखी १८२ गाड्या जोडण्यात आल्या आहेत. एका महिन्यांत दिवाळी येऊन ठेपली असल्याने तिकीट बुकिंगला झळाळी लागली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत या अतिरिक्त सेवांचा विस्तार केला असून, नियमित आणि विशेष गाड्यांसाठी लवकर आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
एलटीटी-सावंतवाडी रोड मार्गावर साप्ताहिक विशेष
कोकणातील प्रवाशांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सावंतवाडी रोड या मार्गावर आठ विशेष गाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०११७९ ही साप्ताहिक विशेष १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी एलटीटी येथून सकाळी ८.२० वाजता प्रस्थान घेईल आणि सावंतवाडी रोडला रात्री ९ वाजता पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११८० सावंतवाडी रोड येथून रात्री १०.२० वाजता सुटेल आणि एलटीटीला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता येईल. या गाड्या ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ येथे थांबतील.
एलटीटी-दानापूर द्विसाप्ताहिक विशेष सेवा
उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एलटीटी ते दानापूर या मार्गावर ४० फेऱ्या चालवल्या जातील. गाडी क्रमांक ०१०१७ ही २७ सप्टेंबर ते १ डिसेंबर दरम्यान प्रत्येक सोमवार आणि शनिवारी एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१०१८ ही २९ सप्टेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान सोमवार आणि बुधवार रोजी दानापूर येथून रात्री १२.३० वाजता प्रस्थान घेईल आणि एलटीटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता येईल. या सेवेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील प्रवाशांना सोयीचा प्रवास मिळेल.
इतर प्रमुख मार्गावर कशा असतील विशेष फेऱ्या?
विविध मार्गांवर अनेक विशेष गाड्या धावणार आहेत. यात एलटीटी-मऊ द्विसाप्ताहिक (४० फेऱ्या), एलटीटी-बनारस द्विसाप्ताहिक (४० फेऱ्या), एलटीटी-करीमनगर साप्ताहिक (६ फेऱ्या), एलटीटी-तिरुवनंतपूरम साप्ताहिक (२० फेऱ्या), पुणे-अमरावती साप्ताहिक (१६ फेऱ्या), पुणे-सांगानेर साप्ताहिक अतिजलद (६० फेऱ्या), पुणे-गोरखपूर (१३० फेऱ्या), पुणे-हजरत निजामुद्दीन साप्ताहिक अतिजलद (५६ फेऱ्या), कोल्हापूर-सीएसएमटी साप्ताहिक (२० फेऱ्या), लातूर-हडपसर (७४ फेऱ्या), सीएसएमटी-गोरखपूर (१३२ फेऱ्या), दौंड-कलबुरगी (१३६ फेऱ्या), नागपूर-पुणे साप्ताहिक (२० फेऱ्या), नागपूर-समस्तीपूर साप्ताहिक (२० फेऱ्या), एलटीटी-दानापूर दैनिक (१३४ फेऱ्या), एलटीटी-नागपूर साप्ताहिक अतिजलद (२० फेऱ्या), पुणे-दानापूर (१३४ फेऱ्या), एलटीटी-लातूर साप्ताहिक (२० फेऱ्या) यांचा समावेश आहे.
प्रवाशांनी काय काळजी घ्याल?
या विशेष गाड्यांमुळे सणासुदीत प्रवास सोपा होईल, तरीही तिकीटांसाठी IRCTC वेबसाइट किंवा स्टेशन काउंटरवर लवकर बुकिंग करावी. विशेष गाड्यांचे भाडे नियमित गाड्यांपेक्षा १.३ टक्के जास्त असू शकते. मध्य रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी स्टेशनवर अतिरिक्त सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून ठेवल्या आहेत. या नियोजनामुळे लाखो प्रवाशांना गावी जाण्याची सुविधा मिळेल आणि सणांचा आनंद साजरा करता येईल.