महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ सप्टेंबर | बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून दिला. प्रचंड विध्वंस पाहण्यास मिळाला. १६ मध्यम, १२७ लघू प्रकल्प ओसंडून वाहू लागले. सर्वच नद्या, नाल्यांना महापूर आला. बंधारे फुटले, नदीचे पाणी शेतात घुसले, शेकडो गावांची वाहतूक ठप्प झाली. पावसाच्या रौद्ररूपाने शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तब्बल तीन लाख हेक्टरवरील खरीप हंगाम पाण्यात बुडाला. काढणीला आलेले सोयाबीन उद्धवस्त झाले. हातातोंडाशी आलेला कापसाचा घास नेस्तनाबूत झाला. आष्टी तालुक्यात कांद्याचा चिखल झाला. बाजर्यांचे कणसं पाण्यात वाहून गेले. यंदा शेतीतून नफा तर काहीच नाही. केलेली मेहनत वाया जाणार, यंदा शेती आतबट्ट्याची राहणार.शेती उद्धवस्त झाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी चिंतेच्या गर्तेत अडकले आहे.
शेतकर्यांना वेशीस अडवण्याचे काम कधी सरकारने केले तर कधी निसर्गाने. पंधरा वर्षापासून शेतकर्याला नागवण्याचे काम चालू आहे. कधी नव्हे ते मे महिन्यात पाऊस झाला. मोठ्या उत्साहाने काळ्या आईची ओटी भरली आणि आश्वासक पावसाने धोका दिला. कोरडा दुष्काळ पडतो की काय असे वाटत असतानाच पावसाने दिलासा देण्याचे काम केले. पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. प्रचंड नुकसान झाले. पिकांची वाढ खुंटली. एक लाख हेक्टरवरील पीक पाण्यामध्ये होते.त्यातूनही कसेबसे सावरणारा शेतकरी दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने अक्षरश: उद्धवस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. काढणीला आलेले सोयाबीन, पाण्याखाली हरवले. शेतामध्ये गुडघ्याएवढे पाणी घुसले. कापूस, बाजरी आडवी झाली. कांद्याचा चिखल झाला. वर्षभर काबाड कष्ट करून सोनं पिकवलेल्या शेतकर्यांच्या घामाची माती झाली. बीड जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवरील खरीप हंगाम पाण्यामध्ये नेस्तनाबूत झाला. ओढ्या नाल्याचे आणि नदीचे पाणी शेतीत घुसले. प्रचंड नुकसान झाले. आता काय खावे आणि वर्ष कसे काढावे या चिंतेमध्ये शेतकरी थरथरणार्या हाताने आणि लुकलुकणार्या डोळ्याने पाण्यात तरंगत असलेल्या पिकांकडे पाहतच राहिला. अर्धा खरीप सध्या पाण्यामध्ये बुडालेला आहे. पंचनामे होतील, तुटपुंजी मदतही मिळेल मात्र बरकत येणारे धान्य यंदा लक्ष्मीच्या रूपाने घरात येते की नाही याबाबत शेतकर्यांनाच आता विश्वास राहिला नाही.