महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ सप्टेंबर | मुंबई – महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५’ अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहेत. मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ७३ व ९६ नुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला असून, तो तात्काळ लागू होणार आहे.

ठरवलेले भाडेदर
बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर ₹ १०.२७ प्रमाणे प्रवासी भाडे आकारले जाईल. याशिवाय पहिला टप्पा १.५ किमी चा असुन प्राथमिक भाडे ₹ १५/- इतके अनिवार्य असेल. म्हणजेच प्रवास कितीही छोटा असो, किमान ₹१५ आकारले जाणार असून, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला ₹१०.२७ प्रमाणे दर लागू होईल.

परवाना व कार्यक्षेत्र
राज्य परिवहन प्राधिकरणाने तीन प्रमुख कंपन्यांना (मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., मे. रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि., व मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि.) तात्पुरता “मुंबई महानगर क्षेत्रासाठी प्राव्हिजनल लायसन्स” मंजूर केला आहे.

या परवान्याची मुदत ३० दिवसांची असून, त्यानंतर अंतिम लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल.
तात्पुरत्या परवान्यातील सर्व अटी-शर्ती मान्य करूनच कंपन्यांना पुढील परवाना देण्यात येईल.

राज्य सरकारचा उद्देश
या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होऊन, प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य परिवहन मंत्री श्री ‌प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात

किमान भाडे – ₹१५/-

त्यानंतर प्रति किलोमीटर दर – ₹१०.२७/-

सध्या उबेर, रॅपिडो व अॅनी टेक्नॉलॉजीज या कंपन्यांना परवाना

मुंबई महानगर क्षेत्रात प्रायोगिकरित्या सेवा सुरू होणार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *