पाकिस्तानही नेपाळ च्या मार्गावर ? भ्रष्टाचार, महागाई अन् अराजकता…जनतेच्या उद्रेकाचा सरकारनं घेतलाय धसका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ सप्टेंबर | भ्रष्टाचार, हुकूमशाही कारभारानं ठिणगी पेटली. त्यात सोशल मीडिया बंदीनं तेल ओतलं आणि नेपाळमध्ये कॉमन मॅनच्या उद्रेकाचा भडका उडाला. या भडक्यात नेपाळ सरकार बेचिराख झालं. संतापाच्या लाटेचा तडाखा इतका जबरदस्त होता की, अवघ्या काही तासांत सत्तापालट झाला. ‘जेन झी’नं नेपाळचा राजकीय नक्शाच बदलून टाकला. आता पेटलेलं नेपाळ शांत झालंय, पण त्याची धग पाकिस्तानला बसणार की काय, याचा धसका पाकिस्तानी सरकार आणि तिथल्या लष्करानं घेतल्याचं दिसतंय. कारण पाकिस्तानमध्येही भ्रष्टाचार बोकाळलाय. महागाईनं सर्वसामान्य होरपळतोय. त्यामुळं तिथंही सर्वसामान्यांच्या संतापाचा बांध कधीही फुटू शकतो. तसं झालं तर, पाकिस्तानचीही गत नेपाळसारखी व्हायला वेळ लागणार नाही, असं बोललं जात आहे.

नेपाळमध्ये जेन झी रस्त्यावर उतरली. त्यांनी देशातील सत्ताच उलथवून लावली. केपी शर्मा ओलींसह अनेकांना राजीनामा द्यावा लागला. संतापलेल्या युवकांनी तर मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना पळवून पळवून मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नेपाळच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून असलेल्या पाकिस्ताननंही या सगळ्याचा धसका घेतलाय. नेपाळच्या तरुणाईने सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत सरकारच्या नाकीनऊ आणले होते. पाकिस्तानमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भीतीपोटी पाकिस्तान सरकारने नेपाळमधील या घटनांचे वृत्त प्रसारित होऊ नये म्हणून बंदी घातली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. 125 अब्ज डॉलरपेक्षा जास्तीचं कर्ज डोक्यावर आहे. त्यामुळं 75 टक्के उत्पन्न फक्त कर्ज फेडण्यात जात आहे. महागाईमुळे सामान्यांना जीवन जगणं कठीण झालंय. दूध 260-280 रुपये लीटर, टोमॅटो 180 रुपये किलो आणि गव्हाचे पीठ हे 122 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. भ्रष्टाचारामध्ये तर पाकिस्तान जगात 135 स्थानावर आहे.

जनतेचा आक्रोश आणि सरकारचा हुकूमशाही कारभार
आर्थिक अडचणींना वैतागलेली पाकिस्तानची सामान्य जनता ही रस्त्यावर उतरलीय. इमरान खानच्या समर्थकांकडून सतत सरकार आणि तेथील आर्मीच्या विरोधात आंदोलनं सुरू आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की लोकांना एका वेळचं जेवण मिळणं कठीण झाल्याने आम्हाला मारून टाका अशा घोषणा दिल्या जाताहेत. मात्र, सरकार पोलीस बळाचा वापर करत लोकांवर लाठीमार करत आहे.

बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये अराजकता
पाकिस्तानी सैन्य तेथील आंदोलनांमध्ये अडकले आहे. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये सैन्यदलावर रोज हल्ले होत आहेत आणि या प्रदेशांवरील सैन्याचे नियंत्रण जवळजवळ संपुष्टात आले आहे. ही परिस्थिती देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण करत आहे.

नेपाळमधील हिंसक आंदोलनानं पाकिस्तान सरकारमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक संकट, भ्रष्टाचार आणि जनआक्रोशामुळे कोणत्याही वेळी पाकिस्तानमध्ये अराजकता निर्माण होऊ शकते. नेपाळमध्ये जे घडलं, तेच आपल्यासोबतही घडेल, अशी भीती पाकिस्तानी मंत्र्यांना आहे.

अशियामध्ये सत्तापालटाचा काळ
श्रीलंका, बांगलादेश, इंडोनेशिया आणि आता नेपाळमध्ये सत्तापालट झालाय. सरकार उलथवून लावण्यामागची मुख्य कारणं भ्रष्टाचार आणि नेत्यांचा हुकूमशाही कारभार. पाकिस्तानमध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळं आता पाकिस्तानचा नंबर लागतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *