महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ सप्टेंबर | Pune Traffic: पुण्यात गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस एवढा दमदार होता की, शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. महत्त्वाच्या सगळ्याच रस्त्यांची कोंडी झाली आहे. पुणेकरांना तासन्सात रस्त्यावर ताटकळत थांबावं लागत आहे.
रस्त्यावर पाणीच पाणी
सिंहगड रस्ता: शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
कोथरूड आणि बाणेर: चांदणी चौक ते कोथरूड रस्ता आणि कोथरूड येथील डावी भुसारी कॉलनी या भागातही रस्त्यांवर पाणी साचले आहे. बाणेर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
शहरातील बाणेर रस्त्यावरील औंध भागात असलेल्या सकाळ नगर परिसरात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे बाणेर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच पुणे विद्यापीठ परिसर, सांगवी, पाषाण, बाणेर येथेही सर्वत्र पाणी साचले आहे.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरही वाहतूक विस्कळीत
पुणे-अहमदनगर महामार्गावरील रांजणगाव गणपतीजवळ अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला असून, वाहने हळू-हळू चालवावी लागत आहेत, ज्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने पाणी उपसून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
मुसळधार पावसामुळे पुणे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.