महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २० सप्टेंबर | राज्यात नवरात्रोत्सवात धो-धो पाऊस बरसणार आहे. विशेषत: मध्यमहाराष्ट्र, कोकण तसेच मराठवाड्यात २६ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मागील आठवड्यापासून मान्सूनने राजस्थानच्या पश्चिम भागातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. पुढील दोन दिवसांत उर्वरित राजस्थान गुजरात, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काशीर या भागातून मान्सून परतण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. तर महाराष्ट्रामधून 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता वाढली आहे. असे असले तरी राज्यात 26 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच ऐन नवरात्रोत्सवात जोरदार पाऊस बरसणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व व उत्तरपूर्व भागापासून ते म्यानमार बांगलादेशच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा 25 सप्टेंबर रोजी तयार होणार आहे. त्यामुळेच पावसाचा जोर कायम आणि मुसळधार राहणार आहे. तसेच सध्या उत्तर प्रदेश ते पश्चिम विदर्भापर्यंत (मध्यप्रदेश पार करून) हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती कार्यरत आहे. याचबरोबरच उत्तर अंदमान म्यानमार किनारपट्टीपासून दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टीपर्यंत (मध्य बंगालचा उपसागर) आंध्रप्रदेश, रॉयलसीमापर्यंत चक्रीय स्थिती कार्यरत आहे, त्यामुळेच राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हा जोर 26 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे.
दरम्यान 18 ते 25 सप्टेंबरच्या आठवड्यातील अंदाजानुसार, तळकोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात थोडा अधिकचा पाऊस राहणार आहे. तर 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या कालावधीत दक्षिण मध्यमहाराष्ट्राचा काही भाग वगळता जोरदार पाऊस आहे. विशेष म्हणजे कोकण किनारपट्टीवर सरासरीच्या अधिकच्या पावसाचा इशारा या कालावधीत देण्यात आला आहे.
असे आहेत यलो अलर्ट (तारखेसह)
रायगड- (21,22), रत्नागिरी- (21,22), सिंधुदुर्ग- (23), जळगाव- (23), नाशिक- (22 ते 24), अहिल्यानगर- (21 ते 24), पुणे- ( 21 ते 24), कोल्हापूर घाटमाथा- (23, 24), कोल्हापूर- (23, 24), सातारा- (22 ते 24), सातारा घाटमाथा- (23, 24), सांगली- (22 ते 24), सोलापूर- (22 ते 24), संभाजीनगर- (21 ते 24), जालना- (22 ते 24), परभणी (22), बीड- (21 ते 24), हिंगोली- (21 ते 24), लातूर- (21 ते 24), नांदेड- (21 ते 24), धाराशिव- (21 ते 24), अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत 21 सप्टेंबरपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.