महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २१ सप्टेंबर | राज्यातील काही भागात मागील 2-3 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. तर काही भागात शनिवारी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यात वादळी वा-यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यावेळी काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. दरम्यान, उत्तर अंदमान समुद्रात म्यानमारच्या किनाऱ्यालगत सोमवारपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे.
या वाऱ्यांच्या प्रभावामुळे 25 सप्टेंबरपर्यंत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण उत्तर प्रदेशापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात सर्वत्र रविवरापासून पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील. मुंबईतही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबईत मागील काही दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे उकाडा सहन करावा लागत आहे. तापमानातही काहीशी वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३०.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील तापमान १ अंशाने अधिक नोंदले गेले.
पावसाचा अंदाज कुठे
मेघगर्जनेसह पाऊस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव.
हलक्या ते मध्यम सरी देखील बरसणार आहे. हा पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे बरसेल.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?
यंदा पावसाच्या तडाख्यामुळे राज्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतक-यांसह राजकीय वर्तुळातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. सरकारने त्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं आहे. अकोला आणि वाशिममधील शेतीच्या नुकसानीच्या पाहणीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. सोबतच शेतक-यांना हताश न होण्याचं आवाहनही केलं आहे.