Ideal weight chart: उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? चार्ट वाचून पाहा तुम्ही लठ्ठ तर नाही ना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २१ सप्टेंबर | आपल्या प्रत्येकाला फीट आणि फाईन रहायला आवडतं. आपल्या शरीराचं आरोग्य टिकवण्यासाठी उंची आणि वजन यांचा योग्य तो समतोल असणं गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की, वजन फक्त दिसण्यात फरक आणतं, पण प्रत्यक्षात ते आपल्या आरोग्याशी थेट जोडलेले आहे.

जर वजन गरजेपेक्षा जास्त किंवा खूपच कमी झालं तर अनेक आजारांचे धोके वाढतात. या समतोलाची ओळख पटवण्यासाठी वैद्यकशास्त्रात एक सूत्र वापरण्यात येतं. ज्याला बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) असं म्हणतात.

बीएमआय म्हणजे काय आणि तो कसा मोजला जातो?
बीएमआय म्हणजे शरीरातील वजन आपल्या उंचीच्या प्रमाणात योग्य आहे का हे दर्शवणारा आकडा. याचं सूत्र असं आहे –

BMI = वजन (किलोमध्ये) / उंची (मीटरमध्ये)²

जर तुमचा बीएमआय 18.5 ते 24.9 दरम्यान असेल तर तो योग्य मानला जातो. 18.5 पेक्षा कमी असल्यास व्यक्ती कृश (अंडरवेट) मानली जाते तर 25 पेक्षा जास्त बीएमआय म्हणजे जादा वजन किंवा स्थूलतेचा (ओव्हरवेट/ओबेसिटी) धोका असतो.

तज्ज्ञांच्या मते, बीएमआय हा एक प्राथमिक मापक आहे, पण तो पूर्णपणे अचूक नाही. विशेषतः भारतीयांसाठी. कारण बीएमआयमध्ये पोटाची चरबी (belly fat) दिसून येत नाही, आणि तीच सर्वात धोकादायक मानली जाते.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे (ICMR) म्हणणं आहे की, फक्त बीएमआयवर न अवलंबून राहता पोटाची चरबी आणि कमरेचा घेर मोजणंही महत्त्वाचं आहे. पुरुषांची कंबर जर 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त किंवा महिलांची कंबर 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, तर ते लठ्ठपणाचे आणि हृदयरोगाचे लक्षण मानले जाते.

उंचीनुसार योग्य वजन किती असावे?
152 सेमी (5 फूट) : स्त्रिया – 40 ते 50 किलो, पुरुष – 43 ते 53 किलो

160 सेमी (5.3 फूट) : स्त्रिया – 47 ते 57 किलो, पुरुष – 50 ते 61 किलो

165 सेमी (5.5 फूट) : स्त्रिया – 51 ते 62 किलो, पुरुष – 55 ते 68 किलो

170 सेमी (5.7 फूट) : स्त्रिया – 55 ते 67 किलो, पुरुष – 60 ते 73 किलो

175 सेमी (5.9 फूट) : स्त्रिया – 59 ते 72 किलो, पुरुष – 65 ते 79 किलो

180 सेमी (6 फूट) : स्त्रिया – 63 ते 77 किलो, पुरुष – 70 ते 85 किलो

योग्य वजन का गरजेचं आहे?
जास्त वजन असल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि सांध्यांचे विकार होण्याची शक्यता वाढते. तर वजन कमी असल्यास शरीर अशक्त होते, पोषणाची कमतरता भासते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

डिस्क्लेमर : कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *