महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २४ सप्टेंबर | पुणेकरांच्या सोयीसाठी ‘पीएमपी’च्या ताफ्यात तब्बल आठ डबल डेकर बस येणार आहेत. त्यांची ‘ ट्रायल रन ‘ देखील घेण्यात आली आहे. या डबल डेकर बस ज्या मार्गांवर धावणार त्या मार्गांवर झाडांच्या फांद्या, लटकणाऱ्या वायर यांसारखे अडथळे असू नयेत. हे अडथळे नसतील, असेच मार्ग डबल डेकर बससाठी निवडण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर चार मार्गांवर आठ बसची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच या बस सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘पीएमपीएमएल’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महापालिका भवन येथे माध्यमांशी बोलताना आयुक्त नवलकिशोर राम यांनी बैठकीत झालेल्या विविध विषयांची माहिती दिली. आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले, “पीएमपी आर्थिक सक्षम झाल्याशिवाय उपाय नाही. यासाठी बसची संख्या वाढविण्याचा विषय चर्चेला आला. प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने एक हजार सीएनजी बस घेण्याचा विषय कार्यपत्रिकेवर होता. यामध्ये ‘टाटा’ आणि ‘अशोक लेलँड’ कंपनीच्या बस घेण्याबाबत चर्चा झाली.’
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपी कंपनी तोट्यात चालली आहे. कंपनी आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी बस मार्गांचे सुसूत्रीकरण तसेच नवीन बसची खरेदी यासह इतर विषयांवर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. ‘पीएमपी’च्या डेपोंचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करण्यासाठी तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील सल्लागार नेमण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली,’ अशी माहिती ‘पीएमपी’चे संचालक आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
या बैठकीत “मार्ग सुसूत्रीकरणाची सुरुवात महापालिकांच्या हद्दीपासून करून नंतर ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, यावर सर्व संचालक मंडळाचे एकमत झाले. ‘पीएमपी’च्या मालकीच्या अनेक जागा आहेत. दहा डेपो आहेत. त्या जागा मोकळ्या पडलेल्या आहेत. त्यांचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.” असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
शहरातील हिंजवडी फेज थ्री वर्तुळ, रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी,मगरपट्टा सिटी ते कल्याण नगर मेट्रो स्टेशन,पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ मार्गे विमान नगर अशा मार्गावर चाचणी सुरू आहे. डबलडेकर बसची काही दिवस अजून चाचणी सुरू राहणार आहे. येत्या काही दिवसात प्रवाशांना बसून ही चाचणी घेतली जाणार असून त्यानंतर डबल डेकर बाबत निर्णय घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा बस घेण्यात येतील तसेच काही मार्ग देखील वाढवण्यात येणार आहे. पुण्यातील वाढती लोकसंख्या मुळे आणि वाहनांच्या संख्येमुळे रस्त्यावरची कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या डबल डेकर मधून 85 प्रवाशी प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार असून त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.