पाऊस थांबला, पूर कायम; पंचनाम्यासाठी ड्रोनचे चित्रणही पुरावा- मुख्यमंत्र्यांची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २५ सप्टेंबर | मराठवाडा, विदर्भ, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा देणाऱ्या पावसाने बुधवारी विश्रांती घेतली. मात्र, गेले आठ-दहा दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेले पुराचे संकट कायम आहे. राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी जोर धरत असताना बुधवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्तांसाठी मदतीचे निकष शिथिल करण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मात्र, हवामान विभागाने शुक्रवारपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने चिंतेचे ढग कायम आहेत.

मराठवाड्यात पुराने मोठे नुकसान झाले. जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे २ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील २२ हजार रहिवाशांना स्थलांतरित केले, तर जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. या पुराचा फटका वाहतुकीवर दिसून आला. पुणे-सोलापूर महामार्ग, सोलापूर-विजापूर, सोलापूर-कोल्हापूर या मार्गांवरील वाहतूक काही ठिकाणी ठप्प झाली. साताऱ्यात संततधार पावसाने भातशेतीची वाढ खुंटली आहे. स्ट्रॉबेरी रोपांवरही रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

तातडीची गरज म्हणून ड्रोनचे छायाचित्रण किंवा मोबाइलवर काढलेले छायाचित्रही पंचनामा म्हणून गृहीत धरून पूरग्रस्तांना मदत करू. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठी तयार करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ
अतिवृष्टीच्या पाहणीसाठी मराठवाड्यात मंत्री, पालकमंत्र्यांची रीघ लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोटीतून पाहणी केली. जालन्यामध्ये बबनराव लोणीकर यांनी ट्रॅक्टर चालविले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक हेही आज दौऱ्यात दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी या गावापासून पाहणी सुरू केली.

छायाचित्राचा वाद
शेतकऱ्यांना किराणा व अन्नधान्यांची मदत घेऊन येणाऱ्या गाड्यांना परंडा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी अडवले. तीन दिवसांपासून पाण्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना उशिरा मदत करून राजकारण करत असल्याचा आरोप करत काही शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मात्र, घरातील सर्व वस्तू भिजलेल्या आहेत, अशा स्थितीमध्ये ज्यांना गरज आहे, त्यांना मदत घेऊ द्या, असे काही जणांनी समजावले. त्यामुळे परंडा तालुक्यात मदतीचे वाटप करण्यात आले.

गोदाकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती
परभणी, नांदेड : गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर बुधवारी गोदाकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवली. विशेषतः गंगाखेड शहर व परिसरात पाण्याचा वेढा पडला असून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. काल पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्यांमध्ये गोदाकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात करण्यात आली होती. नांदेडमध्ये एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

गोदाकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती
परभणी, नांदेड : गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर बुधवारी गोदाकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवली. विशेषत: गंगाखेड शहर व परिसरात पाण्याचा वेढा पडला असून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. काल पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्यांमध्ये गोदाकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात करण्यात आली होती. नांदेडमध्ये एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार अनेक भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर काही भागांत कमी कालावधीत अधिक पाऊस पडेल. राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शेतीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *