महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ सप्टेंबर | गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर आजपासून पुन्हा वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सकाळपासूनच सोलापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालीय. पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. पंढरपूरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पंढरपूरमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज आहे. यामुळे सीना नदीला पुन्हा पूर येण्याचा धोका आहे. अतिवृष्टी झाली तर सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. यामुळे सीना नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढेल. परिणामी पुन्हा भीषण पूरस्थितीचा सामना सीना नदीकाठच्या लोकांना करावा लागेल. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी काठच्या गावांमधील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलाय.
सोलापुरात दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानं पूर ओसरायला सुरुवात झाली होती. अनेक गावांमधील ५ ते ६ फुटांपेक्षा जास्त पाणी कमी झालं होतं. दरम्यान, आता पावसाचा जोर पुन्हा वाढल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूरसह मराठवाड्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गेल्या दहा दिवसात अतिवृष्टीने सोलापूरसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मोठी जीवितहानी आणि पशुधनाचं नुकसान झालंय. सोलापुरात मंगळवारी अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली होती. पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. घरांमध्ये पाणी घुसलंय, शेती खरडून गेलीय. बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. पुरामुळे हजारो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. अजूनही जिल्ह्यातले ५० पेक्षा जास्त गावांना जोडणारे रस्ते बंद आहेत. यामुळे सुरक्षित स्थळी हलवलेल्या नागरिकांना अजून काही दिवस बाहेरच मुक्काम करावा लागेल.