महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ सप्टेंबर | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्याच्या ८ आणि ९ तारखेला महाराष्ट्रात येणार आहेत. राज्यातील पूर परिस्थितीच्या संदर्भात हा दौरा नाही. एक फार मोठे आंतरराष्ट्रीय फिनटेक फेस्टिव्हल होत आहे. या फिनटेक फेस्टिव्हलमध्ये या क्षेत्राशी संबंधित जगभरातील लोक येणार आहेत. या कार्यक्रमाला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान असे दोघेही येत आहेत. महाराष्ट्र हळूहळू फिनटेकची राजधानी बनू लागला आहे. फिनटेकमधील सर्वांत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे हे फिनटेक फेस्टिव्हल महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नवी मुंबई येथील विमानतळाचे उद्घाटन असेल किंवा मेट्रो-३ चे उद्घाटन असेल, हेदेखील त्यावेळेस करतील. नवी मुंबई विमानतळाला निश्चितपणे दि. बा. पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे, असा प्रस्तावही आम्ही केलेला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारचीही अनुकूलताच आहे. याबाबतची प्रोसेस केंद्र सरकारमध्ये सुरू आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, नवी मुंबई विमानतळाला आम्ही दि. बा. पाटील यांचे नाव देऊ शकतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील डिफेन्स कॉरिडॉरबाबत सकारात्मक
आतापर्यंत ६० हजार कोटींची गुंतवणूक आहे आणि निश्चितपणे अजून भरीव गुंतवणूक आपल्याला अपेक्षित आहे. मला असे वाटते की, डिफेन्सचे काम आपण केले, तर ३ ते ५ लाख कोटींची गुंतवणूक आपल्याकडे येऊ शकते. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर महाराष्ट्र डिफेन्स कॉरिडॉर यासंदर्भात प्रेझेंटेशन दिले. यामुळे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला बुस्ट मिळेल. अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकेल. राज्यातील डिफेन्स कॉरिडॉर आपल्याला तीन ठिकाणी करता येईल, असे आपण दाखवले आहे. यातील पहिला भाग पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर येथे करता येऊ शकेल. दुसरा भाग आपण नाशिक, धुळे या भागात करू शकू आणि तिसरा भाग नागपूर, वर्धा, अमरावती येथे करू शकू. तीनही ठिकाणी तो कसा होऊ शकेल, याबाबतचा रोडमॅप आणि याचा संपूर्ण अभ्यास केलेले बुकलेट हे पंतप्रधान मोदी यांना दिलेले आहे. याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, गडचिरोलीत माइनिंग कॉर्पोरेशनला माइन्स देऊन, गडचिरोलीत मायनिंग डेव्हलपमेंट योग्य पद्धतीने केले, तर त्याचा रोडमॅप कसा असेल, याबाबतही माहिती दिली. देशात सगळ्यात स्वस्त स्टील आपण तयार करू शकतो. चीनपेक्षाही त्याचा दर कमी ठेवता येऊ शकेल. तसेच ग्रीन स्टील तयार करण्याच्या संदर्भातही रोडमॅप समोर ठेवलेला आहे. देशाची स्टीलची गरज गडचिरोली भागवू शकेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिली.