महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ सप्टेंबर | राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळं शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अशातच पुढील सहा दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत राज्यातील हवामान कसे असेल याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. उद्यापासून दसऱ्यापर्यंतच्या पुढील 6 दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून जोरदार पावसाची शक्यता
उद्यापासून दसऱ्यापर्यंतच्या सहा दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान स्पष्ट व ठळक आकारात रुपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे उद्या(शनिवारी 27 ला) सकाळ पर्यंत हवेच्या तीव्र कमी दाबात रुपांतराची व चंद्रपूर हिंगोली पैठण अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे मार्गक्रमनाच्या शक्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजे शनिवार दिनांक 27 सप्टेंबर पासुन दसऱ्यापर्यंतच्या 6 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
अतिजोरदार पावसाचे जिल्हे कोणते?
27 सप्टेंबर
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा व धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये उद्या अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
28 सप्टेंबर
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक छत्रपती संभाजीनगर व पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा या जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
29 व 30 सप्टेंबर
मुंबई पालघर ठाणे रायगड व नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा या भागात देखील अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उघडीपीची शक्यता
शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर पासुन पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते.
नद्यांच्या खोऱ्यातील जल आवक व धरण जल -संचय –
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे ह्या नद्यांच्या धरणातून पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते.
नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी
हवामान खात्याने उद्या नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर आता उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली आहे. तसा निर्णय जिल्हाधिकारी कार्यलयातून आता निर्णय हा जारी करण्यात आला आहे.