महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ सप्टेंबर | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाने तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. दोन दिवसांपूर्वी पूरस्थिती झालेल्या सोलापूर, धाराशिव, जालना अन् लातूरमध्ये पुढील दोन दिवस अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आज आणि उद्या मराठवाड्यासह राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वारे पश्चिम दिशेने वाहू लागल्याने संपूर्ण महाराष्ट्रात याचा परिणाम होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अतिमुसळधार पावसाचा इशारा कुठे अन् कधी ?
शनिवार, २७ सप्टेंबर
नांदेड, लातूर, सोलापूर, पुणे, धाराशिव , लातूर, बीड, अहिल्यानगर
रविवार, २८ सप्टेंबर
सोलापूर, पुणे, सातारा, बीड, अहिल्यानगर,धाराशिव, पुणे, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर
लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर.
लातूर जिल्हा हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतो आहे. आज दिवसभर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे..