महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर | लेह : लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करण्याच्या मागणीसाठी गेल्या बुधवारी बंददरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर लेहमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी सलग पाचव्या दिवशी कायम होती. प्रदेशात इतरत्र जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षा दलांनी रस्त्यांवर संचलन केले.
‘ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी’ या देशातील शास्त्रज्ञांच्या गटाने सध्या लडाख पोलिसांच्या ताब्यात असलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करून त्यांच्या सुटकेची मागणी केली. वांगचूक यांनी मार्च २०२४ मध्ये केलेले २१ दिवसांचे उपोषण आणि पर्यावरण बदलाकडे लक्ष वेधण्यासाठी लेह ते दिल्लीपर्यंत केलेली पदयात्रा याचा दाखला या शास्त्रज्ञांच्या गटाने दिला आहे. देशभरातून वांगचूक यांच्या सुटकेची
मागणी होती आहे.
‘लडाखच्या संस्कृतीवर हल्ला’
लडाखची जनता, संस्कृती आणि परंपरांवर भाजप, संघाच्या वतीने हल्ले केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी केला.
केंद्रशासित प्रदेशाचा राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करण्याच्या मागणीचेही त्यांनी समर्थन केले. लडाखचे लोक हक्क मागताना भाजपने चार युवकांचा जीव घेत पर्यावरणवादी नेते वांगचूक यांना तुरुंगात डांबून उत्तर दिल्याचे राहुल म्हणाले.
पत्नी म्हणाली, पाकशी संबंध शक्यच नाहीत
सोनम वांगचूक यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचे तसेच आर्थिक अनियमततेसंबंधी करण्यात आलेले आरोप त्यांची पत्नी गितांजली अंगमो यांनी फेटाळले आहेत. वांगचूक गांधीवादी मार्गाने निदर्शने करीत होते. परंतु, सीआरपीएफच्या कारवाईमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे
त्या म्हणाल्या.