महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर | पुणे पोलिसांकडून गँगस्टर निलेश घायवळला फरार घोषित करण्यात आलं आहे. निलेश घायवळ टोळीवर मकोका दाखल होताच पोलिसांनी घायवळविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळचा बोगस पासपोर्ट झी २४ तासच्या हाती लागलाय. निलेश घालयवळच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनवर पोलिसांनी दिलेला शेरा पाहून सगळेच हडबडले आहेत. निलेश घायवळ याच्यामुळे आता पोलिस अडचणीत येणार आहेत.
निलेश घायवळ याच्या पासपोर्टवर शिक्षणाचीही खोटी माहिती देण्यात आलीय. पत्त्यावर 4 ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे. शिक्षणदेखील खोटं दाखवलं आहे. घायवळ स्वत: एमकॉम असताना पासपोर्टवर 8 वी पास असल्याची माहिती दिली. कोथरूड पोलीस घायवळविरोधात बोगस पासपोर्ट प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत.
सराईत गुन्हेगार निलेश घायवळ याच्या पासपोर्ट बाबत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे. निलेश बन्सीलाल घायवळ, राहणार गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडा रोड अहमदनगर असा नाव व पत्ता असलेला अर्जदार याने तात्काळ पासपोर्ट सुविधे अंतर्गत पासपोर्ट मिळण्यासाठी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. सदर पासपोर्टचे प्रकरण पडताळणीसाठी अहिल्यानगर म्हणजेच तत्कालीन अहमदनगर पोलिसांकडे दिनांक 23.12.2019 रोजी ऑनलाईन आले होते. अर्जदार याने दिलेले नाव आणि नमूद केलेल्या पत्त्यावर कोतवाली पोलीसांनी पडताळणी केली असता संपर्क होऊ शकला नाही व सदर पत्त्यावर मिळून आला नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सदरचे पासपोर्ट प्रकरण दि. 16.01.2020 रोजी प्रतिकूल म्हणजेच “Not Available” रिमार्क करून पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयास पाठवले होते. यामुळे घायवळच्या पासपोर्ट अर्जावर अशा प्रकारचा शेरा देणारा पोलिस कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे आता पोलिसच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा कोथरूडच्या गोळीबाराच्या घटनेआधीच लंडनला आपल्या मुलाकडे गेल्याचं समोर आलंय. तो कितीही पळाला तरी व्हिसाची मुदत संपताच त्याला आज ना उद्या भारतात यावेच लागेल, तेव्हा लगेच त्याला अटक करू असं पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलं. तसेच निलेश घायवळच्या टोळीवर डबल मकोकांतर्गंत कारवाई करणार असून त्यांची सर्व बँक खातीही गोठवल्याची माहिती त्यांनी दिली.