महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर | ऑनलाइन बेटिंग अर्थात सट्टेबाजी व गेमिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित एका मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) काही क्रिकेटपटू व अभिनेत्यांची मालमत्ता जप्त करू शकते. त्यांनी ऑनलाइन बेटिंग ॲपच्या जाहिरातींमधून मिळालेल्या पैशाचा वापर विविध प्रकारच्या संपत्ती खरेदी करण्यासाठी केला असल्याचे ‘१ एक्सबेट’ या पोर्टलशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीतून समोर आल्याची माहिती रविवारी ईडीच्या सूत्रांनी दिली.
या लोकांची झाली चौकशी
ऑनलाइन बेटिंगप्रकरणी ईडीने क्रिकेटपटू युवराज सिंह, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, शिखर धवन व चित्रपट अभिनेता सोनू सूद, मिमी चक्रवर्ती (तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार), अंकुश हाजरा यांची चौकशी केली आहे. काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचीदेखील ईडीने चौकशी केली आहे. मनी लाँड्रिंग कायद्याच्या कमल ५० अंतर्गत ईडीने क्रिकेटपटू, अभिनेत्यांचे जबाब नोंदविले आहेत.