महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० सप्टेंबर | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळधार सुरू असल्यामुळे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान, कमी दाब प्रणाली गुजरातच्या दिशेनं सरकल्यामुळे राज्यातील पावसाचा जोर आता काही प्रमाणात ओसरला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप राहणार असून, तर काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. नांदेड जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं या भागात येलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळला. सोमवारी २९ सप्टेंबर रोजी २४ तासांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर भागात पावसाची संततधार सुरू होती. पालघरच्या तलासरी येथे तब्बल २४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, भंडाऱ्यात उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात सध्या ढगाळ वातावरणासह ऊन अन् पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
समुद्रसपाटीपासून तब्बल ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे निर्माण झाले आहेत. हे वारे अरबी समुद्राच्या दिशेनं सरकत असून, उद्या म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. उत्तर अंदमान समुद्रातील चक्राकार वाऱ्यामुळे उद्या नव्यानं कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.
२६ सप्टेंबर रोजी संपूर्ण राजस्थान, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांसह आणखी काही भागांत मॉन्सूननं परतीचा मार्ग निवडला आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशच्या आणखी काही भागात मॉनसून परतला आहे.
मुंबई, पुणे, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी
मुंबई, पुण्यासह मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा जोर आजपासून कमी होणार आहे. २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. दरम्यान, ३० सप्टेंबर नंतर पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यातील जिल्ह्यांना आज कुठल्याही प्रकारचा “अलर्ट” नाही. काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरींची शक्यता आहे.