महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – लंडन – दि. ६ सप्टेंबर – कोरोना व्हायरस महामारीचा प्रभाव खेळांवर देखील पडला आहे. या संकटाच्या काळात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असले तरी नियमांचे विशेष पालन केले जात आहे. कोरोनाचा धोका पाहता मैदानात आता चेंडूवर थुंकी लावण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. मात्र यातच आता एका क्रिकेटपटूंने चेंडूवर थेट सॅनिटायझरच लावल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या इंग्लंडचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू मिच क्लेडनला कथितरित्या चेंडूवर सॅनिटायझर लावल्याने त्याच्या काउंटी टीम ससेक्सने निलंबित केले आहे. अशाप्रकारे एखाद्या क्रिकेटपटूला निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ असावी.
37 वर्षीय क्लेडनवर मिडिलसेक्सविरुद्ध मागील महिन्यात झालेल्या सामन्यात चेंडूवर सॅनिटायझर लावल्याचा आरोप आहे. या सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतले होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड या प्रकरणाची चौकशी करत आहे. ससेक्सने आपल्या वेबसाईटवर मिच क्लेडनला निलंबित करण्यात आले असल्याचे सांगितले. या निलंबनामुळे क्लेडनला बॉब विलिस ट्रॉफीमधील पुढील सामना खेळताना येणार नाही.