महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ९ ऑक्टोबर | देशातील इलेक्ट्रिक कार विक्रीत सप्टेंबर महिन्यात अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा)च्या ताज्या आकडेवारीनुसार, इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची एकूण किरकोळ विक्री दुपटीहून अधिक वाढून १५ हजार ३२९ युनिट्सवर पोहोचली आहे. मागील वर्षी याच महिन्यात ही विक्री फक्त ६ हजार १९१ युनिट्स इतकी होती.
इव्ही बाजारात टाटा मोटर्सने आपले वर्चस्व कायम राखले आहे. कंपनीने सप्टेंबर २०२५मध्ये ६ हजार २१६ इलेक्ट्रिक कार्स विकल्या. मागील वर्षीच्या ३ हजार ८३३ कार विक्रीच्या तुलनेत यात तब्बल ६२ टक्क्यांनी वाढ आहे. एमजी मोटरने मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल तीनपट वाढ नोंदवली आहे. महिंद्रा अँड महिंद्रानेही उल्लेखनीय झेप घेत सप्टेंबरमध्ये ३ हजार २४३ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे.
इव्ही बाजारात ‘दुप्पट’ वाढीचे मिळत आहेत संकेत
तज्ज्ञांच्या मते वाढते इंधन दर, शासकीय प्रोत्साहन योजना आणि चार्जिंग नेटवर्कचा विस्तार
यामुळे इव्ही वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. येत्या काही महिन्यातही ही वाढीची गती कायम राहण्याची शक्यता आहे.
मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती
सहा महिन्यांत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या किमतीइतक्याच असतील, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ अपेक्षित आहे.
दुचाकी विक्रीतही मोठी वाढ : सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीतही उल्लेखनीय वाढ झाली आहे. या महिन्यात एकूण १ लाख ४ हजार २२० दुचाकी विकल्या गेल्या. गेल्या वर्षी ही विक्री ९० हजार ५४९ इतकी होती. आता या विक्रीत १५ टक्के वाढ झाली आहे.
इव्ही दुचाकी विक्रीत टॉप नेमके कोण आहे?
टीव्हीएस मोटर २२,५०९
बजाज ऑटो १९,५८०
एथर एनर्जी १८,१४१
ओला इलेक्ट्रिक १३,३८३
हिरो मोटोकॉर्प १२,७५३