महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० ऑक्टोबर | म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5 हजार 354 घरांसाठी आणि 77 भूखंडांच्या विक्रीकरता लॉटरीची घोषणा करण्यात आली होती. आता म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरीची सोडत 11 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात येईल.
‘म्हाडा’च्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व वसई (पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5 हजार 354 सदनिका व ओरोस (सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता जाहिरात काढण्यात आली होती. यासाठी 1 लाख 84 हजार 994 अर्ज आले असून अनामत रकमेसह 1 लाख 58 हजार 424 अर्ज प्राप्त झाले आहेत. कोकण मंडळातर्फे लॉटरी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल सुलभतेने पाहता येईल.
कुठे पाहता येईल लॉटरी?
विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाइटवर सायंकाळी ६ नंतर प्रसिद्ध होईल. विजेत्या अर्जदारांना ‘एसएमएस’द्वारेही विजेता ठरल्याबाबतच संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणार आहे. तसंच, सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलइडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लिंकवर व म्हाडाच्या फेसबुक व यू-ट्यूब पेजवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा आहे. थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात येणार असल्याने नागरिकांना तत्काळ निकाल जाणून घेता येणार आहे.
अर्ज विक्रीतून कमावले 8 कोटी रुपये
म्हाडाने केवळ अर्जाच्या विक्रीतून म्हाडाने तब्बल 8 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. तसेच शासनालादेखील जीएसटीच्या माध्यमातून 1 कोटी 42 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5354 घरांच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. या सोडतीसाठी एकूण 1,84,994 अर्ज आले असून अनामत रकमेसह 1,58,424 अर्ज प्राप्त झाले आहेत. अनामत रकमेसह भरलेले अर्ज सोडतीसाठी पात्र ठरतात. घरांसाठी अर्ज भरताना म्हाडा अर्जदाराकडून अनामत रकमेसह 590 रुपये चार्ज आकारते. यात 500 रुपये अर्ज शुल्क आणि 90 रुपये जीएसटीचा समावेश असतो. अर्ज शुल्काचे 500 रुपये म्हाडाला मिळतात. अशा प्रकारे 1,58,424 अर्जाच्या विक्रीतून म्हाडाने 7 कोटी 92 लाखांची कमाई केली आहे. तसेच प्रतिअर्ज 90 रुपये जीएसटीच्या माध्यमातून 1 कोटी 42 लाख 58 हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.