६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० ऑक्टोबर | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यातील ई-बस प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना ६० दिवसांचे भाडे भरून ९० दिवस प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

ई-बस सेवेत पास प्रणाली सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. विशेषतः नोकरी किंवा व्यवसायानिमित्त रोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ होणार आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बसेस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले.

महामंडळाच्या या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, पर्यावरणपूरक व आरामदायी प्रवासासाठी ई-बसचा वापर वाढण्यास मदत होईल.
– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे – अलिबागसारख्या मार्गावर मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवासी तसेच ई-बसेस सेवा आहेत. योजनेमुळे प्रवाशांचा फायदा होईल.
– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी काँग्रेस

जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे…
पास उपलब्ध बसेस : ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवा (ई-शिवनेरीवगळून).
मासिक पास (३० दिवस) : २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ३० दिवस वैध.
त्रैमासिक पास (९० दिवस) : ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ९० दिवस वैध.
लवचिकता : उच्च सेवा वर्गाचा (ई-बस) पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करू शकतील.
फरक नियम : निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास, दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक १०० टक्के दराने भरावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *