महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० ऑक्टोबर | गुजरातच्या दोन औषध कंपन्यांनी महाराष्ट्रात पुरवठा केलेल्या दोन औषधांमध्ये ‘डायथिलीन ग्लायकॉल ’चे प्रमाण अधिक आढळले. या औषधांच्या वितरणावर ‘एफडीए’ने प्रतिबंध घातला असून ६० बाटल्या जप्त केल्या आहे.
‘डायथिलीन ग्लायकॉल’चे प्रमाण जास्त असलेले कफ सिरप प्राशन केल्याने प्रकृती खालावलेल्या मध्यप्रदेशातील १७ मुलांचा नागपुरात मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही काळजी घेतली जात आहे.
मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांचे नमुने ‘एफडीए’च्या औषध शाखेच्या पथकाने तपासणीसाठी पाठवले होते. अहवालात गुजरातमध्ये तयार झालेल्या दोन औषधांत ‘डायथिलीन ग्लायकॉल’चे प्रमाण अधिक आढळले.
मध्यप्रदेश एफडीएच्या अहवालातही हे प्रमाण अधिक आढळले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील औषध नियंत्रक डी. आर. गहाणे यांनी गुजरातमधील रेडनेक्स फार्मास्युटिकल्स कंपनीच्या रेस्पिफ्रेश टीआर आणि मेसर्स शेप फार्माच्या रिलाइफ या औषधांवर प्रतिबंध घातला आहे.
विक्रीसाठी आलेला साठा परत पाठवला
एफडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, या औषधांत ‘डायथिलीन ग्लायकॉल ’चे प्रमाण १.६ टक्के आढळले. ते ०.१ टक्क्याहून अधिक नको. हे औषध चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात विक्रीसाठी आले होते. एफडीएला येथे ६० बाटल्या मिळाल्या. नागपुरातही एकाकडे या औषधांच्या सहाशे बाटल्या होत्या.
मात्र, विक्रीपूर्वीच हा साठा परत पाठवण्यात आल्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष चौधरी यांनी सांगितले. या औषधांचा राज्यातील इतरही काही भागात पुरवठा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे हे औषध नागरिकांपर्यंत जाऊ न देण्याचे मोठे आवाहन एफडीएपुढे आहे.