महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० ऑक्टोबर | गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात धुमाकुळ घालणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. पावसाने ओढ दिल्यानंतर उकाड्यातही वाढ झाली आहे. आता लवकरच पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. पुढील एक दिवसांत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून मोसमी वारे माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. सरासरीपेक्षा जास्त पाऊस यंदा झाला आहे.
पाऊस माघार घेणार
14 सप्टेंबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. तर, राज्यातील काही भागांतून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली असून परतीचा प्रवास सुरू केला आहे.
बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेले कमी दाब क्षेत्र, तसेच शक्ती चक्रीवादळ यामुळे मोसमी पावसाचा परतीचा पाऊस लांबला. साधारण 10 ते 12दिवसांपासून पावसाचा परतीचा प्रवास खोळंबला आहे. पुढील एक – दोन दिवसांत राज्यातून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू हण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज कसं असेल हवामान?
महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान होत आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळं उन्हाचा तडाखा वाढला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शक्ती चक्रीवादळाचा परिणाम कमी झाल्यानंतर पश्चिम-मध्य अरबी समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळं येत्या 24 तासांत सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस हजेरी लावू शकतो.
मागील वर्षीचा परतीचा प्रवास
23 सप्टेंबर – दक्षिण राजस्थान, कच्छमधून परतीचा प्रवास सुरू
5 ऑक्टोबर- महाराष्ट्रातून (नंदुरबार)
15 ऑक्टोबर- संपूर्ण दशातून माघार