चीनवर १०० टक्के टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १२ ऑक्टोबर | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून येणाऱ्या सर्व आयातींवर अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. हा निर्णय १ नोव्हेंबरपासून किंवा त्यापूर्वीच लागू होऊ शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा मंदीच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

गुरुवारी चीनने दुर्मीळ धातूंच्या निर्यातीवर नवीन नियंत्रण घातल्यामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. चीनच्या या नियंत्रणांमुळे ते जगाला ओलीस ठेवत आहे, असा आरोप त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला होता. ट्रम्प हे द. कोरियाच्या दौऱ्यावर जात असून त्या दरम्यान ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार होते. आता जिनपिंग यांच्यासोबत चर्चा होईल का याची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे.

चीनकडून नवे नियंत्रण
गुरुवारी चीनने इलेक्ट्रॉनिक्स, संगणक चिप्स, जेट इंजिन यांसाठी वापरल्या जाणाऱ्या या धातूंच्या निर्यातीवर परवानगी घेणे अनिवार्य केले आहे. चीनने लष्करी उत्पादनांमध्ये वापर होणाऱ्या या दुर्मीळ धातूंमधील घटकांच्या निर्यातीस पूर्ण बंदी घातली आहे. चीनकडे दुर्मीळ धातूंच्या एकूण खाणकामातील ७० टक्के खाणकाम असून चुंबकांचे ९३ टक्के उत्पादन चीन करत आहे. त्यामुळे हे निर्बंध अमेरिकेसाठी गंभीर आहेत.

ट्रम्प यांचा संताप
दुर्मीळ धातूंवरच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्याचे चीनचे धोरण शत्रूसमान असून ते जगाला वेठीस धरण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. चीनच्या या निर्णयावर उत्तर म्हणून अमेरिकाही महत्त्वाच्या सॉफ्टवेअरवर नियंत्रण आणेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

शेअर बाजार अस्थिर
अमेरिका व चीनच्या टॅरिफ युद्धामुळे एस अँड पी ५०० निर्देशांक २.७ टक्क्यांनी घसरला. शुक्रवारचा दिवस एप्रिलनंतरचा सर्वात वाईट दिवस ठरला. आर्थिक विश्लेषकांच्या मते अमेरिकेच्या निर्णयामुळे सध्या लागू असलेल्या ३० टक्क्यांच्या करावर आणखी १०० टक्के आयातकर बसल्यास उभय देशांदरम्यानचा व्यापार पूर्णपणे ठप्प होऊ शकतो.

राजकीय-आर्थिक ताण वाढण्याची शक्यता
टॅरिफ युद्धामुळे अमेरिकेत महागाई वाढण्याबरोबरच रोजगार बाजारावरही परिणाम होऊ शकतो. सरकारी कर्मचाऱ्यांची कपात आणि सध्या सुरू असलेला शटडाऊनमुळे आधीच अमेरिकेची आर्थिक वाढ मंदावल्याची चिन्हे आहेत.

चर्चेची गरज
‘स्टिम्सन सेंटर’च्या सन युन यांनी सांगितले की, बीजिंगचा हा निर्णय अमेरिकेकडून चीनवरील निर्बंधांच्या प्रत्युत्तरात घेतला गेला असून, दोन्ही बाजूंनी थोडी माघार घेतल्यास तणाव कमी करण्याची शक्यता अजूनही आहे. चीनच्या प्रवक्त्याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *