महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १२ ऑक्टोबर | देशभरात सर्व राज्यांचा आढावा घ्यायचा झाल्यास चार दिशांना तितक्याच वेगवेगळ्या पद्धतींचं हवामान पाहायला मिळत आहे. हवामानात होणारे सातत्यपूर्ण बदल पाहता येत्या काळात देशात थंडीची लाट येणार असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे अफगाणिस्तानच्याही पर्वतीय भागांवरून येणाऱ्या शीतलहरी आणि त्यामुळं जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये वाढणारा थंडीचा कडाका आणि हिमवृष्टी. दरम्यान पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, ओडिशातून दक्षिण पश्चिम मान्सून आणि इथं महाराष्ट्रातूनही नैऋत्य मान्सून परतीच्या वाटेवर असून, त्यामुळं अधूनमधून परतीच्या पावसाच्या सरी नाकारण्यात येत नाहीत. मात्र त्यांची तीव्रता तुलनेनं अतिशय कमी असेल.
महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे नाहीसा होण्यास 48 तास…
महाराष्ट्रातून मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला असून, त्यामुळं तापमानवाढीसही सुरुवात झाली आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या या तापमानामुळं नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम दिसू लागले आहेत. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पाऊस उघडीप देणार असून, उन्हाचा चटका कायम राहणार आहे. किनारपट्टी भागांमध्ये दमट हवामान असल्यानं उष्मा अधिक जाणवेल. तर, मुंबई शहर, उपनगर आणि कोकणातही पाऊस विश्रांती घेणार असून, आता ऑक्टोबरच्या उत्तरार्धात घामाच्या झळा जीवाची काहिली करणार आहेत असा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारपर्यंत राज्यासह गुजरात आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून मान्सून परतला. शनिवारी हे प्रमाण अलिबाग, अकोला, अहिल्यानगर, वाराणासीपर्यंत दिसलं. तर, पुढच्या 48 तासांमध्ये फक्त महाराष्ट्र नव्हे, तर देशाच्या इतरही भागांमधून हे मोसमी वारे परतीचा प्रवास करत सीमा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात राज्यातील सरासरी कमाल तापमानाचा आकडा 35 अंश आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
देशातील हवामानावर या बदलांचा काय परिणाम?
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पश्चिमी झंझावात सक्रिय असल्या कारणानं काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल. मात्र रविवावर ते बुधवारदरम्यान दक्षिणेकडील राज्यांमध्ये अंशत: पावसाची हजेरी असेल. तर, पूर्वोत्तर राज्यांना सावधगिरीचा इशारा आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/1zVo9zYYGL
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 11, 2025
पर्वतीय राज्यांमध्ये हिमवर्षावास सुरुवात झाल्यानं दिल्ली, पंजाबसारख्य़ा मैदानी क्षेत्रांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा आता ही थंडी महाराष्ट्रात पारा केव्हा खाली आणते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.