महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ ऑक्टोबर | ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीच्या स्वरूपात, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील,’’ असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
‘‘निवडणुकांचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पक्षाचा जो काही निर्णय असेल, तो प्रत्येक कार्यकर्ता शिस्तीने पाळेल,’’ असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, निवडणूक स्वबळावर लढायच्या की महायुतीतून याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. कार्यकर्त्यांची इच्छा, भावना आणि संघटनात्मक तयारी यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल.’’ मतदारयादी पारदर्शक असते. प्रत्येक उमेदवाराला आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया उपलब्ध असते. विरोधक मात्र ‘फेक नॅरेटिव्ह’ तयार करून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. मतदार यादीबाबतचा अधिकार निवडणूक आयोगाकडेच आहे, असे ते म्हणाले.