Test Twenty in Cricket : कसोटी, वनडे अन् टी-20नंतर क्रिकेटमध्ये नवा फॉर्मेट ‘टेस्ट ट्वेंटी’ लॉन्च, किती ओव्हरची मॅच होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ ऑक्टोबर | क्रिकेट हा खेळ काळानुसार सातत्याने बदलत आहे. कधी नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली, तर कधी नवीन फॉर्मेटच्या माध्यमातून या खेळात नवनवीन प्रयोग करण्यात आले. आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या इतिहासात मोठा बदल होणार आहे, खेळात एका नव्या फॉर्मेटची एंट्री झाली आहे. चला जाणून घेऊया, काय आहे हा नवा फॉर्मेट ‘टेस्ट ट्वेंटी’?

क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात
15 मार्च 1877 रोजी पहिला कसोटी सामना खेळला गेला. त्यानंतर वनडे फॉर्मेट आला आणि मग झपाट्याने लोकप्रिय झालेला टी-20 जन्माला आला. त्यानंतर द हंड्रेड आणि टी-10 फॉर्मेट्स आले. आता या यादीत नवीन नाव समाविष्ट झाले आहे, तो ‘टेस्ट ट्वेंटी’….

काय आहे ‘टेस्ट ट्वेंटी’ फॉर्मेट? (What is Test Twenty?)
‘द फोर्थ फॉर्मेट’चे सीईओ आणि ‘वन वन सिक्स नेटवर्क’चे कार्यकारी अध्यक्ष गौरव बहिरवाणी यांच्या मते, या नवीन फॉर्मॅटचे नाव टेस्ट ट्वेंटी ठेवण्यात आले आहे. या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक संघाला दोन वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळते, अगदी टेस्ट मॅचप्रमाणे. मात्र हा सामना टेस्टसारखा लांब नसून अधिक वेगवान आणि छोटा असेल. त्यामुळे प्रेक्षकांना सतत रोमांच अनुभवायला मिळेल आणि टीव्ही प्रेक्षकांनाही तो आकर्षक वाटेल.

या फॉर्मेटमध्ये टेस्ट आणि टी-20 दोन्हींचे मिश्रण आहे. काही नियम टेस्टमधून घेतले आहेत, तर काही टी-20मधून, आणि त्यात आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. सामन्याचा निकाल जिंकणे, हरणे, टाय किंवा ड्रॉ अशा कोणत्याही स्वरूपात लागू शकतो, हेच या फॉर्मेटचं खास वैशिष्ट्य आहे.

दिग्गज खेळाडूंची प्रतिक्रिया
सध्या एबी डिव्हिलियर्स, क्लाइव्ह लॉयड, मॅथ्यू हेडन आणि हरभजन सिंग हे या फॉर्मॅटच्या सल्लागार मंडळाचा भाग आहेत. मात्र, हा फॉर्मॅट अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू करण्यात आलेला नाही. यावर एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “या फॉर्मॅटबद्दल सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे खेळाडूंना मिळणारी मोकळीक आणि सर्जनशीलता. ‘टेस्ट ट्वेंटी’ खेळाडूंना स्वतःला व्यक्त करण्याची आणि कोणत्याही भीतीशिवाय खेळण्याची संधी देते. हा फॉर्मॅट खेळाडूंना संतुलन साधायला आणि दोन्ही डावांमध्ये टिकून राहायला शिकवतो.”

तर मॅथ्यू हेडन यांनी सांगितले की, “युवा खेळाडू हे भविष्य आहेत आणि म्हणूनच मी या फॉर्मेटमध्ये सहभागी झालो. दीर्घ फॉर्मॅट खेळाडूंच्या स्वभाव, कौशल्य आणि मानसिक-शारीरिक क्षमतेची खरी परीक्षा घेतो. या नव्या प्रकारात आपल्याला दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टी मिळणार आहेत, एका दिवसात दोन डाव आणि एकूण 80 षटके होतील.”

किती ओव्हरची मॅच होणार?
हा ‘टेस्ट ट्वेंटी’ फॉर्मॅट क्रिकेटला एक नवीन दिशा देऊ शकतो. पारंपरिक कसोटीची गंभीरता आणि टी-20चा झपाटा या दोन्हींचा संगम म्हणजे आधुनिक काळातील एक रोमांचक प्रयोग आहे. टेस्ट ट्वेंटी-20 मध्ये, एका दिवसात दोन वेगवेगळ्या डावांमध्ये एकूण 80 षटके खेळवली जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *