महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ ऑक्टोबर | भारत आता रशियाकडून तेलखरेदी करणार नाही, असे आश्वासन भारताचे पंतप्रधान व माझे मित्र नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिले असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केला. युक्रेनमधील युद्ध संपविण्यासाठी उचललेले हे मोठे पाऊल आहे, असेही ट्रम्प म्हणाले.
भारत रशियाकडून क्रूड तेल विकत घेत असल्याने अमेरिका संतापली होती. या तेल खरेदीतून मिळणाऱ्या पैशातून रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू ठेवले आहे. या गोष्टीमुळे मी भारतावर नाराज झालो. मोदी माझे मित्र असून, ते महान व्यक्ती आहेत. पण त्यांची राजकीय कारकीर्द मी उद्ध्वस्त करू इच्छित नाही, असे ट्रम्प म्हणाले. मोदींशी माझे उत्तम संबंध आहेत. त्यांनी भारत रशियाकडून तेल घेणार नाही, असे मला सांगितले. ही कदाचित मोठी ब्रेकिंग न्यूज होऊ शकते. त्याबद्दल मी सांगू का, असा प्रश्न ट्रम्प यांनीच पत्रकारांना विचारला. (वृत्तसंस्था)
स्रोत विस्तारतोय; भारताचे उत्तर
ट्रम्प यांच्या दाव्याला उत्तर देताना भारताने तेलखरेदीचे स्रोत विस्तारत असल्याचे स्पष्ट केले आहे. परराष्ट्र खात्याने म्हटले की, इंधनाच्या अस्थिर बाजारपेठेत भारतीय ग्राहकांचे हित जपण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय हिताचा विचार करून भारत आपले आयात धोरण आखतो. अमेरिकेबरोबर तेल, ऊर्जाक्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. तेलाचा स्थिर दर व सुरक्षित, सुरळीत पुरवठा भारताला आवश्यक वाटतो. तेलखरेदीच्या स्रोतांच्या विस्तारीकरणासाठी भारत बाजारपेठेतील परिस्थिती पाहून निर्णय घेतो. भारताचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे.
तेलखरेदी भारताच्या हिताशी सुसंगत
आंतरराष्ट्रीय बाजारात रशियाचे तेल आजही सर्वात स्वस्त, किफायतशीर आहे व रशियाचे भारतासोबतचे ऊर्जा संबंध हे भारताच्या राष्ट्रीय हिताशी सुसंगत आहेत, अशी प्रतिक्रिया रशियाचे राजदूत डेनिस अलिपॉव्ह यांनी गुरुवारी या वादावर दिली.
जागतिक बाजारात रशियापुढे अडथळे आणले गेले पण त्यांना न जुमानता, रशियाने सातत्याने
बांधिलकी जपली. तसेच, पर्यायी पुरवठा साखळी व पेमेंट सिस्टीममध्ये देखील लवचिकता दाखवली, असेही ते म्हणाले.
एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान भारताने रशियाकडून १.७५ दशलक्ष बॅरेल तेल आयात केले होते. ही आयात गेल्या वर्षीच्या आयातीपेक्षा चार टक्क्याने कमी आहे. भारत रशियाकडून सुमारे ४० टक्के तेल आयात करतो.
ट्रम्प यांना मोदी घाबरले : राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांना घाबरले असून त्यांनी देशाचे काही महत्त्वाचे निर्णय चक्क अमेरिकेच्या हाती सुपूर्द केले आहेत, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.