महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ ऑक्टोबर | मतदार याद्यांतील घोळाबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवताच निवडणूक आयोगाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्र लिहून सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मांडलेले मुद्दे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत. या आक्षेपांचे काय करायचे, याबाबत योग्य निर्देश मिळावेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
29 पालिका, 247 नगर पालिका, 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकाप नेते जयंत पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी 14 ऑक्टोबर रोजी माझ्या कार्यालयाला भेट देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याची मागणी संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मतदार यादीतील चुकांची दुरूस्ती, 18 वर्षे पूर्ण होणार्या नव्या मतदारांची नोंदणीबाबतच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत, असे चोक्कलिंगम यांनी पत्रात नमूद केले आहे.
या मुद्यांकडे वेधले लक्ष
राज्य निवडणूक आयोगाकडून वापरल्या जाणार्या मतदार यादीत डुप्लिकेट नावे, मतदारांची नावे, वय आणि पत्त्यात मोठया प्रमाणात चुका आहेत. मतदार यादीतील काही त्रुटींबाबत प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनाची प्रत येथे जोडली आहे.
दुबार मतदारांची पडताळणी करून सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीतील दुबार नावे रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यापूर्वी 1 ऑक्टोबर 2025 रोजी 18 वर्षे पूर्ण करणार्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादी प्रकाशित झालेली नाही. यामुळे राजकीय पक्ष किंवा नागरीक यांना निवडणूक यादीतील चुकांबाबतआक्षेप दाखल करण्याची संधी मिळाली नाही.
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याबाबत केलेल्या सूचना आवश्यक त्या योग्य निर्देशांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत असल्याचे चोक्कलिंगम यांनी या पत्रात पुढे म्हटले आहे.