महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २१ ऑक्टोबर | दिवाळी आणि थंडी, असे एक समीकरण आहे. मात्र, यंदा मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत असल्याने दिवाळी थंडीविनाच साजरी होत आहे. सोमवारी कमाल तापमान ३५.९, तर किमान तापमान २५.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
थंडीसाठी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसखाली, तर किमान २० पेक्षा खाली असणे अपेक्षित असते, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले. दरम्यान, या महिन्यात तरी तापमानाचा पारा एवढ्या खाली घसरण्याची शक्यता नसल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच चटके बसण्यास सुरुवात झाली असून, आर्द्रतेच्या कमी-अधिक फरकामुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत. गेल्या आठवड्यातील शुक्रवारी नोंदविलेले ३७ अंश सेल्सिअस हे कमाल तापमान चालू मोसमातील सर्वाधिक कमाल तापमान होते. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले की, चांगल्या थंडीसाठी मुंबईचे कमाल तापमान ३२, तर किमान तापमान २० अंशांखाली घसरले पाहिजे.