✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ ऑक्टोबर २०२५ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिल्याचे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, भारत वर्षअखेरीस रशियन तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, भारत रशियन तेल आयात टप्प्याटप्प्याने बंद करेल आणि वर्षअखेरीस ती ‘जवळजवळ शून्यावर’ आणेल.
“तुम्हाला माहिती आहेच की, भारताने मला शब्द दिला होता की ते रशियन तेल आयात थांबवतील. ही एक प्रक्रिया आहे. तुम्ही ती तत्काळ थांबवू शकत नाही. पण वर्षाच्या अखेरीस, ही आयात जवळजवळ शून्यावर येईल. ही एक मोठी गोष्ट आहे, भारतात रशियातून जवळजवळ ४० टक्के तेल आयात होते. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रेट आहेत. नुकतेच माझ्या त्यांच्याशी बोलणे झाले आहे”, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
#WATCH | Washington DC | Regarding his upcoming meetign with Chinese President Xi, US President Donald Trump says, "India, as you know, has told me they are going to stop…it's a process. You can't just stop (buying oil from Russia). By the end of the year, they'll be down to… pic.twitter.com/XXdL1ETOZf
— ANI (@ANI) October 22, 2025
दरम्यान, भारताने यापूर्वीच अमेरिकेला कोणताही शब्द दिला नसल्याचे सांगत, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हेच प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. देशाचे ऊर्जा धोरण स्थिर किंमती आणि पुरवठा सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य देते, असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
भारत रशियाकडून तेल आयात करतो म्हणून काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५०% टॅरिफ लादले आहे. सोमवारी, रशियन तेल खरेदीवरून भारतावर टीका करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, भारत रशियन तेलाची आयात थांबवणार नाही तोपर्यंत त्यांना टॅरिफ भरावे लागेल. परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणताही फोन कॉल झालेला नाही. भारत रशियन तेल खरेदी थांबवेल या ट्रम्प यांच्या दाव्याबद्दल विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, “बुधवारी दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही फोन कॉल झाला नाही.”
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून संपर्क झाला का? या प्रश्नावर जयस्वाल म्हणाले की, “दोन्ही नेत्यांमध्ये काल झालेल्या कोणत्याही संभाषणाची मला माहिती नाही. दोन्ही नेत्यांमध्ये ९ ऑक्टोबर रोजी शेवटची चर्चा झाली होती, त्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन केले होते.”
