✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३१ ऑक्टोबर २०२५ | पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. हा संघर्ष अखेर काही प्रमाणात थांबताना दिसत आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर तालिबान प्रशासनानेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना बॅकफूटवर यावे लागले. यानंतर आता दोन्ही देशांमध्ये युद्धविरामासंदर्भात (सीजफायर) सहमती झाली आहे. यासाठी तुर्की आणि कतार यांनी मध्यस्थी केली.
तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या एका संयुक्त निवेदनानुसार, 18-19 ऑक्टोबरला दोहा येथे प्राथमिक स्तरावर युद्धविरामासंदर्भात सहमती झाली होती. यानंतर 25-30 ऑक्टोबरदरम्यान इस्तंबूलमध्ये झालेल्या चर्चेत या कराराला अधिक बळकटी देण्यासाठी तुर्की आणि कतार यांनी मध्यस्थी केली. चर्चेदरम्यान सर्व पक्षांनी युद्धविरामाला बळकटी देण्यावर भर दिला आणि युद्धविरामाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र मॉनिटरिंग यंत्रणा तयार करण्यावर एकमत झाले.
दरमयान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात 6 नोव्हेंबर रोजी इस्तंबूल येथे पुन्हा उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत युद्धविरामासंदर्भात पुडील रुपरेषा निश्चित केली जाईल.
Joint Statement on the Talks Between Afghanistan and Pakistan Through the Mediation of Türkiye and Qatar https://t.co/y1SH30i88Q pic.twitter.com/wH4GW3SC9k
— Turkish MFA (@MFATurkiye) October 30, 2025
अफगाणिस्ताननं दिलं होतं जोरदार प्रत्युत्तर –
याच महिन्याच्या सुरुवातीला काबूलमध्ये झालेल्या स्फोटांनंतर दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला होता. अफगाणिस्तानने प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ला केला. अफगाण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत 58 पाक सैनिक मारले गेले. मात्र पाकिस्तानकडून 23 सैनिकांचा मृत्यूचे म्हणण्यात येते.
या संघर्षानंतर कतारच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती झाली होती. यानतंर, इस्तंबूलमधील चर्चेत कसलाही तोडगा निघाला नव्हता. मात्र, तुर्की आणि कतार यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही देश पुन्हा चर्चेच्या टेबलावर आले. यानंतर आता दोन्ही देशांमध्ये युद्धविरामासाठी सहमती झाली आहे.
