![]()
महाराष्ट्र 24- ऑनलाईन: समालखा, 1 नोव्हेंबर 2025 : “आत्ममंथन ही अंतरंगातील एक यात्रा आहे. यास केवळ विचार, मन आणि बुद्धीच्या स्तरावर जाणले जाऊ शकत नाही. यासाठी आपल्या अंतरंगात आध्यात्मिक स्वरूपात चिंतन करण्याची गरज आहे.” हे उद्गार सतगुरु माता सुदीक्षाजी महाराजांनी 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 78व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पहिल्या दिवशी मानवतेच्या नावे आपला पवित्र संदेश देताना व्यक्त केले.
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित या चार दिवसीय संत समागमात संपूर्ण भारतातून तसेच विदेशातून लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्तगण सहभागी होऊन समागमाचा भरपूर आनंद प्राप्त करत आहेत.
सतगुरु माताजी पुढे म्हणाल्या, की प्रत्येक मानवाच्या अंतःकरणात आणि बाह्य जगात एक सत्य निवास करते जे स्थिर आणि शाश्वत आहे. हे सत्य प्रथम जाणले पाहिजे. जेव्हा मानवाला प्रत्येकाच्या अंतरंगातील या सत्याचे दर्शन होईल, तेव्हा त्याच्या मनात प्रत्येकाविषयी प्रेमभाव उत्पन्न होईल. खरे पाहता, परमात्म्याने मानवाला अशा प्रकारे बनवले आहे, की त्याच्या मनात सदैव प्रेमभावनेला प्राथमिकता असावी. तथापि, अज्ञानतेमुळे मनुष्य एकमेकांविषयी द्वेष उत्पन्न होईल असे कारण शोधतो.
अखेर सतगुरु माताजींनी संपूर्ण जगासाठी हीच मंगल कामना केली, की “मानवाने मानवतेचा मार्ग स्वीकारावा, स्वतःचे अंतरंग सदोदित शुद्ध करत जावे जेणेकरून त्याची व्याप्ती वाढत जाऊन संपूर्ण बाह्य जगात सुधार घडेल आणि सगळीकडे प्रेम आणि बंधुभावनेचे वातावरण स्थापित होईल.
तत्पूर्वी, समागम स्थळी आगमन होताच सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे स्वागत संत निरंकारी मंडळाचे प्रधान श्रीमती राजकुमारीजींनी फुलांचा हार घालून तसेच मंडळाचे सचिव प्रवीण खुल्लरजीनी पुष्पगुच्छ भेट देऊन केले. त्याचबरोबर आदरणीय निरंकारी राजपिता रमितजींचे स्वागत निरंकारी मंडळाचे सिनियर एग्झिक्युटिव्ह मेंबर अशोक मंनचंदाजींनी फुलांचा हार अर्पण करून व विदेश विभागाचे इंचार्ज श्री. विनोद वोहराजींनी फुलांचा गुलदस्ता भेट देऊन केले. त्यानंतर या दिव्य जोडीला फुलांच्या सजावटीने सुशोभित खुल्या पालखीमध्ये विराजमान करून समागम पंडालच्या मध्यभागातून मुख्य मंचापर्यंत एका भव्य शोभायात्रेच्या रूपात नेण्यात आले.
मुख्य मंचाजवळ पोहोचताच, सतगुरु माताजी आणि आदरणीय निरंकारी राजपिता रामितजींचे स्वागत संत निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्ट्स (NIMA) च्या 2500 हून अधिक विद्यार्थ्यांकडून भरत नाट्यम नृत्य सादरीकरण व गीताद्वारे करण्यात आले. दिव्य जोडीचे दर्शन व सान्निध्य प्राप्त होताच पंडालमध्ये उपस्थित श्रद्धाळू भक्तांच्या नयनातून आनंदाश्रू वाहू लागले. ही दिव्य जोडीसुद्धा या भक्तगणांना आपले पावन आशीर्वाद प्रदान करत होती. दिव्यतेचा हा अनुपम नजारा प्रेमभक्तीच्या अनुभूतीने ओतप्रोत भरलेला होता. विभिन्न संस्कृतीचे भक्त आपल्या जात, धर्म व भाषेला विसरून प्रेमाभक्तीमध्ये पूर्णपणे तल्लीन झाले होते.
