![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ नोव्हेंबर २०२५ | जुन्या वाहनांचे नूतनीकरण आणि फिटनेस प्रमाणपत्रासाठीच्या शुल्कामध्ये तब्बल दुप्पट ते तिपटीने वाढ झाली आहे. १७ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या निर्णयाचा थेट फटका सर्वसामान्य वाहनमालकांना बसला आहे. आधीच महागाईचा ताण असताना वाढलेल्या शुल्कामुळे अनेक नागरिक नूतनीकरणाची प्रक्रिया पुढे ढकलत आहे. या शुल्कवाढीमुळे वाहनधारकांवर आर्थिक अडचणींचा भार आणखीन वाढला आहे.
केंद्र सरकार रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाने सर्व प्रकारच्या वाहनांचे १० व १५ वर्षांवरील वाहनांचे नूतनीकरण, फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्कामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जुने वाहन वापरणे नागरिकांना परवडणार नाही. पूर्वी १५ वर्षे पूर्ण झालेल्या कारचे नूतनीकरण करण्यासाठी दीड हजार रुपये शुल्क लागत होते. आता त्यासाठी साडेचार ते पाच हजार रुपये खर्च येणार आहे.
या दरवाढीला फटका सर्वसामान्य नागरिकांना देखील बसणार आहे. जड वाहनधारकांसाठीही ही वाढ आर्थिक अडचणीत आणणारी ठरली आहे. १५ ते २० वर्षे वयोगटातील जड वाहनांसाठी सहा हजार रुपये, तर २० वर्षांवरील वाहनांसाठी तब्बल २८ हजार रुपये फिटनेस शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या वाढीव शुल्काचा वाहतूकदारांनी तीव्र विरोध केला आहे.
नूतनीकरणात वाढलेले शुल्क
१५ वर्षांपर्यंतच्या मोटारसायकलीसाठी ६०० रुपये
१५ ते २० वर्षांच्या वाहनांसाठी ते दीड हजार आणि २० वर्षांपेक्षा जास्त जुन्या दुचाकीसाठी तीन हजार रुपये
१५ वर्षांपर्यंतच्या कारसाठी ८००
१५ ते २० वर्षांच्या कारसाठी ४,५०० रुपये
२० वर्षांवरील वाहनांचा फिटनेस खर्च तब्बल नऊ हजार रुपये
१५ ते २० वर्षांदरम्यानच्या जड वाहनांसाठी सहा हजार रुपये
२० वर्षांपुढील जड वाहनांसाठी २८ हजार रुपये
