![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक २ डिसेंबर २०२५ | पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची मोठी पाईपलाईन मोरवाडी म्हाडा कॉलनी परिसरात मध्यरात्री फुटली आणि काही तासांतच हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेलं. शहराला पाणी वाचवण्याच्या सूचना दिल्या जातात, पण इथे संपूर्ण टॅंकरभर पाणी क्षणाक्षणाला जमिनीत मिसळत होतं – अशी चीड नागरिकांनी व्यक्त केली.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दीपक भोजने आणि सौ. रेणुकाताई भोजने यांनी तत्काळ महापालिका कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली, तसेच ‘सारथी’ पोर्टलवरही तक्रार नोंदवली. सकाळी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर, “पाणीपुरवठा बंद केल्याशिवाय दुरुस्ती शक्य नाही,” अशी माहिती देण्यात आली. तोपर्यंत मात्र शुद्ध पाण्याचे तळे रस्त्यावर साचत राहिले.
नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले—
“आम्हाला पाण्याची एक बादलीसाठी फिरवतात, आणि इथे हजारो लिटर पाणी वाहून जातं… जबाबदारी कोण घेणार?”
परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाने त्वरित कारवाई करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी केली असून, वेळीच लक्ष देऊन तक्रार नोंदवणाऱ्या भोजने दाम्पत्याचे विशेष आभार मानले आहेत.
