![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ७ डिसेंबर २०२५ | सलग पाच दिवस इंडिगोच्या अचानक रद्द होणाऱ्या फ्लाईट्समुळे देशभरातील विमानतळांवर प्रचंड गोंधळ झाला. कुठे प्रवासी–कर्मचाऱ्यांमध्ये वाद, तर कुठे तासन्तास प्रतीक्षा… अखेर परिस्थिती हाताबाहेर जाताच विमान वाहतूक नियामक डीजीसीए पुढे सरसावले आणि कठोर कारवाई केली.
डीजीसीएने इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स व अकाउंटेबल मॅनेजर इसिड्रो पोर्केरास यांना कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासांत स्पष्टीकरण मागितले. यासोबतच मोठा निर्णय घेत रद्द फ्लाईटच्या तिकिटांचे पूर्ण पैसे रविवारी संध्याकाळी ८ वाजेपर्यंत परत करणे, तसेच प्रवाशांचे हरवलेले सामान ४८ तासांत परत देणे याचे आदेशही देण्यात आले.
इंडिगोची दिलासादायक घोषणा
गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता इंडिगोनं परिस्थिती नियंत्रणात आणत मोठं पाऊल उचललं आहे. जाहीर केलेल्या नव्या निवेदनानुसार—
✈️ आज (रविवार) तब्बल 1500 हून अधिक फ्लाईट्स उड्डाणे घेणार आहेत!
यामुळे 95% कनेक्टिव्हिटी पुन्हा पूर्ववत होणार.
इंडिगोने त्यांच्या 138 पैकी 135 ठिकाणांसाठी सेवा पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली.
नेटवर्क रीस्टोअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या, याची कंपनीने खुलेपणाने कबुली दिली.
प्रवाशांची माफी – इंडिगोची नम्र प्रतिक्रिया
— IndiGo (@IndiGo6E) December 6, 2025
कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटले—
“गेल्या काही दिवसांत प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्याकडे अजून बरंच काम बाकी आहे, पण आम्ही आमच्या ग्राहकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी कटिबद्ध आहोत. या कठीण काळात पाठिंबा देणाऱ्या प्रवासी व कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो.”
केंद्रीय मंत्रालयाची कडक भूमिका
नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी देखील सर्व एअरलाइनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. भविष्यात अशा प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून इंडिगोला ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
