![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ७ डिसेंबर २०२५ | भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण मंत्रालयाने सरळ दणका देत तिकीटदरांना लगाम लावला आहे. ‘इंडिगो’च्या मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाल्याने शेकडो प्रवासी अडकून पडले आणि या संधीचा गैरफायदा घेत काही कंपन्यांनी पुणे–मुंबईसारख्या छोट्या मार्गावर तब्बल ६१ हजार रुपयांचे तिकीट विकले. परिस्थिती हाताबाहेर जातेय हे लक्षात येताच मंत्रालयाने तत्काळ हस्तक्षेप करत प्रवाशांना संरक्षण देण्यासाठी भाड्यावर कमाल मर्यादा निश्चित केली, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
या नव्या धोरणात सरकारने प्रवास अंतरानुसार चार टप्पे निश्चित केले आहेत. जवळपासच्या ५०० किमीच्या प्रवासासाठी कंपन्यांना जास्तीत जास्त ७५०० रुपये, तर ५०० ते १००० किमी या अंतरासाठी जास्तीत जास्त १२ हजार रुपये इतकेच तिकीट आकारण्याची अट घालण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील १००० ते १५०० किमी अंतरासाठी १५ हजारांची मर्यादा असून १५०० किमीपेक्षा अधिक अंतरासाठी १८ हजारांचा सर्वोच्च दर निश्चित करण्यात आला आहे. “अवास्तव दरवाढ रोखण्यासाठी आणि प्रवाशांना स्थिर, परवडणारा प्रवास मिळावा यासाठीच हा निर्णय,” असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
सणासुदीच्या दिवसांत मनमानी दरवाढ आणि फ्लाइट रद्द होण्याच्या सत्रामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी ही निर्णय-घोषणा मोठा दिलासा मानली जाते. सर्व विमान कंपन्यांनी या भाडेमर्यादांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कारवाई टाळता येणार नाही, असा कडक इशारा मंत्रालयाकडून देण्यात आला. परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत या मर्यादा लागू राहणार आहेत. म्हणजेच, पुढील काही दिवस ‘कोण कितीही मागेल तेवढं’ अशी मनमानी बाजारपेठेत दिसणार नाही.
दरम्यान, ‘इंडिगो’च्या सुरू असलेल्या गोंधळावर नागरी विमान वाहतूक विभागाने ✈️DGCA मार्फत तातडीची कारवाई केली आहे. प्रवाशांचे तिकिटांचे परतावे विलंब न लावता तत्काळ द्यावेत आणि हरवलेले सामान दोन दिवसांत परत सुपूर्द करावे, असे थेट आदेश IndiGo Airlines ला देण्यात आले आहेत. अन्यथा नियमानुसार कठोर कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा देत मंत्रालयाने कंपन्यांच्या मनमानीला आता पूर्णविराम देण्याची तयारी दाखवली आहे.
